पुणे : पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील नीचांकी १३.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे शनिवारीही पुणे राज्यातील सर्वांत थंड शहर ठरले. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार रविवारपासून शहरात दुपारनंतर अंशत: ढगाळ स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात वाढ होऊ शकते.
पुणे शहर आणि परिसरात यंदाच्या हंगामात पाच वेळा राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. ३० ऑक्टोबरला शहरात १२.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. यंदाच्या हंगामातील पुण्यातील हे नीचांकी तापमान ठरले. त्याच दिवशी हे तापमान राज्यातही नीचांकी होते. त्यानंतर ३ नोव्हेंबरला १३.१ अंश सेल्सिअस राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. गुरुवारी (१० नोव्हेंबर) पुण्यात १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान पुन्हा राज्यातील नीचांकी तापमान ठरले. त्यानंतर शुक्रवारी १२.८ अंश सेल्सिअस राज्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद शहरात झाली. हे तापमान सरासरीच्या तुलनेत २.९ अंशांनी कमी होते. शनिवारी सलग तिसऱ्या दिवशीही १३.४ अंश सेल्सिअस किमान तापमान राज्यातील नीचांकी तापमान ठरले.
शहरात सध्या दिवसाचे कमाल तापमान ३० ते ३१ अंशांच्या आसपास नोंदविले जात आहे. त्यामुळे उन्हाचा हलका चटका आहे. मात्र, कमाल तापमान काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील राज्यांत सध्या पावसाळी स्थिती आहे. त्याचा परिणाम राज्याच्या काही भागांवर होणार आहे. शहरात रविवारपासून अंशत: ढगाळ वातावरण तयार होणार आहे. त्यातून रात्रीच्या किमान तापमानात किंचित वाढ होऊन गारवा कमी होईल. दिवसाच्या कमाल तापमानात घट होऊन उन्हाचा चटकाही कमी होण्याची शक्यता आहे.