पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेनंतर आता पुणे जिल्ह्यात आणखी एक महापालिकेची स्थापना होणार आहे. चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद आणि राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महापालिका निर्माण केली जाणार आहे. याबाबत अभिप्रायासह विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून राज्य शासनाने अहवाल मागविला आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवडमहापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश होऊन महापालिकांची हद्दवाढ झालेली आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या परिसरातील नवीन गावांचा या दोन्ही महापालिकेत समावेश करणे योग्य होणार नाही.चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महापालिका निर्माण करणे याबाबत मागणी होत आहे. चाकण, आळंदी आणि राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या परिसरालगतच्या आसपासच्या गावांचा समावेश करून नवीन स्वतंत्र महापालिका करणे राज्य शासनाच्या विचाराधिन आहे.
हेही वाचा : मराठा सर्वेक्षणात दुसऱ्या दिवशीही अडथळ्यांची शर्यत; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले ‘हे’ कठोर निर्णय
त्यासाठी चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील आसपासच्या गावांचे एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या, हद्द याबाबतचा तपशिल घ्यावा. तिन्ही नगरपरिषदेतील हद्दीची एक स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त, पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिका आयुक्त आणि चाकण, आळंदी, राजगुरू नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांचा अहवाल मागवून घ्यावा आणि अभिप्रायासह शासनाने विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून अहवाल मागविला आहे.