नवीन वर्षांच्या स्वागतासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, परमिटरूम यांना पुणे पोलिसांनी थर्टी फर्स्टचा जल्लोष करण्यासाठी पहाटे पाचपर्यंत परवानगी दिली आहे. मात्र, परवानगी देताना पोलिसांकडून थर्टी फर्स्ट साजरा करताना भान राखण्याचे आवाहन केले आहे. हॉटेल व आस्थापनाबाहेर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांना दिला आहे. पुणे शहरात पहिल्यांदाच पहाटेपर्यंत पोलिसांनी परवानगी दिल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नववर्षांचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी वेगवेगळे बेत आखले आहेत. त्यात आता पोलिसांनी एक जानेवारीच्या पहाटे पाचपर्यंत परवानगी दिल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. गृहविभागाच्या आदेशानुसार शहर पोलीस आयुक्तालयातील परवाना प्राप्त हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब यांना आस्थापना व परवाना कक्ष एक जानेवारीच्या पहाटे पाचपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी काही नियमांचे पालन करावे, अशी सुचना देखील पोलिसांनी केली आहे.
हॉटेल, परमिटरूम, क्लबच्या परिसरात त्यांनी खासगी सुरक्षारक्षक तैनात कारावेत. त्या ठिकाणी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल. ध्वनिप्रदूषण, कायदा नियमांचे पान करणे आस्थापनांना बंधनकार राहील. वाढीव वेळेची परवानगी फक्त बंदिस्त जागेतील आस्थापनांना राहील. सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था याचा विचार करून योग्य वाटल्यास आवश्यकतेनुसार वेळेच्या बंधनामधील शिथीलता नाकारण्याचे अधिकार परवाना अधिकाऱ्यांना राहतील. डीजेंना रात्री बारापर्यंतच परवानगी राहणार आहे. मोकळ्या व सार्वजनिक जागेतील कार्यक्रमांना रात्री बारापर्यंत परवानगी राहणार आहे. विनापरवाना पार्टी करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Dec 2014 रोजी प्रकाशित
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटे पाचपर्यंत
नवीन वर्षांच्या स्वागतासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, परमिटरूम यांना पुणे पोलिसांनी थर्टी फर्स्टचा जल्लोष करण्यासाठी पहाटे पाचपर्यंत परवानगी दिली आहे. मात्र, परवानगी देताना पोलिसांकडून थर्टी फर्स्ट साजरा करताना भान राखण्याचे आवाहन केले आहे.

First published on: 28-12-2014 at 02:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thirty first celebration to five am