राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. “हे असंवेदनशील शिंदे सरकार आहे, सर्वसामान्य माणसाविषयी या सरकाराल काहीही प्रेम नाही.” असं त्या म्हणाल्या.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना खासदार सुळे यांनी सांगितले की, “मी श्री विठ्ठलाचे आशीर्वाद घेतले असून आभार मानण्यासाठी आले आहे. सरकारला अस्थिरतेचा धोका आहे, असं जे अजित पवार म्हणतात ते खरं आहे कारण ज्या पद्धतीने लोक सुरत, गुवाहाटी, गोवा असं भारतदर्शन करून आले आणि ज्या रीतीने बाहेरील राज्यातील पोलीस आपल्या आमदारांना हाताळत होते ते दुर्दैवी आहे. हे जे काय सुरू आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि समाजकारणासाठी हे हिताचं नाही.”
तसेच, “शिवसेनेला मित्रपक्ष म्हणून शेवटपर्यंत साथ दिली आणि देत राहणार आहे. बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवला होता. त्याला दुखावणे म्हणजे बाळासाहेबाना दुखावल्यासारख आहे.” असं देखील यावेळी सुळे यांनी स्पष्ट केले.
याचबरोबर, “फक्त सत्ता आणि पैशाचं हे आता आलेलं सरकार आहे. त्याला सर्वसामान्य माणसाविषयी काहीही प्रेम नाही.” हे असंवेदनशील शिंदे सरकार आहे.