पुणे : गेली दोन वर्षे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा झाल्याने यंदाचा उत्सव आवाजी झाल्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रशास्त्र विद्यापीठाने केलेल्या पाहणीतून दिसून आले. गणेशोत्सवातील पहिल्या पाच दिवसांमध्ये शहराच्या विविध भागात ध्वनिपातळी ८० ते ९० डेसिबलवर गेल्याचे असल्याचे आढळून आले. सर्वसाधारण दिवशी ही पातळी ६० डेसिबलपर्यंत पोचते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : सात दिवसांच्या गणपतीला निरोप; आता अनंत चतुर्दशीची तयारी सुरू

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे तंत्रशास्त्र विद्यापीठातील उत्पादन अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवातील पहिल्या पाच दिवसांमध्ये शहराच्या विविध भागांमध्ये आवाजाच्या शास्त्रीय पद्धतीने नोंदी घेतल्या. त्यात जय टिपरे, नंदन झंवर, सार्थक मोरकर, आर्यमन महाजन, श्री खेडकर, सेजल मेश्राम, प्रत्युषा म्हस्के, रोशनी पाडवे, अपेक्षा शेळके, आयुष जैन, शर्वरी मोराडे, श्रद्धा पाटील, जयवंत नांदोडे यांचा सहभाग होता.मॉडर्न महाविद्यालय, शिंदे पार, उंबऱ्या गणपती, टिळक चौक, गोखले चौक, सूस रस्ता, बालाजी चौक, बाणेर रस्ता, पाषाण, सुतारवाडी, गांजवे चौक, नळस्टॉप, गरवारे महाविद्यालय, आयडियल कॉलनी, आनंद नगर, शिवाजी पुतळा, मनपा भवन, बाजीराव रस्ता, बळीराम चौक, बेलबाग चौक, जंगली महाराज रस्ता, लाल महाल, छावणी परिसर, रविवार पेठ या भागांमध्ये ध्वनिपातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. वेळेची सूट दिल्यानंतर भक्तांची गर्दी आणि ध्वनि पातळीत वाढ, मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये आवाजी गणेशवंदना झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. 

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे तंत्रशास्त्र विद्यापीठाचे डॉ. महेश शिंदीकर म्हणाले, की सर्व प्रकारचे आवाज मिळून दैनंदिन ध्वनिपातळी सरासरी साठ डेसिबल असते. मात्र गणेशोत्सवाच्या पहिल्या पाच दिवसांमध्ये शहराचा मध्यवर्ती भाग आणि उपनगरांमध्ये ध्वनिपातळी ८० ते ९० डेसिबलवर पोहोचल्याचे निदर्शनास आले. गेली दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पद्धतीने झाल्याने यंदा उत्साहाने केलेले देखावे, रोषणाई, गर्दी या सर्वांचा एकत्रित परिणाम ध्वनिपातळी वाढण्यावर झाल्याचे दिसून येते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This year ganeshotsav average sound level 80 to 90 decibels pune print news ysh