पुण्याच्या सांकृतिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेला ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यंदा नव्या जागेत होण्याची शक्यता आहे. कारण, यंदा शनवार पेठेतील रमणबाग शाळेच्या मैदानावर हा महोत्सव होणार नसल्याचे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने यंदा ‘सवाई’साठी शाळेचे मैदान उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे मंडळाला लेखी कळवले आहे. मात्र, महोत्सवासाठी नव्या जागेबाबत अद्याप निश्चिती झाली नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

पुण्यात होणारे बहुतेक संगीत महोत्सव रमणबाग शाळेच्या मैदानात आयोजित करण्याचा प्रघात पडला आहे. ‘सवाई’ देखील गेल्या ३२ वर्षांपासून याच मैदानावर घेतला जातो. मात्र, या संगीत महोत्सवाच्या काळातच शाळेच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्यामुळे मैदान उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे शाळेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शाळेच्या या भुमिकेमुळे महोत्सवाच्या आयोजनाच्या तयारीला कमी वेळ मिळणार अाहे. रमणबागच्या मैदानावरच महोत्सव घेण्याबाबत सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. त्यानंतर जर यात यश आले तर त्याबाबत रसिक प्रेक्षकांना आणि पुणेकरांना कळवण्यात येईल, असे श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.

अभिजात संगीताचा जगातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा संगीत महोत्सव म्हणून याकडे पाहिले जाते. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी त्यांचे गुरु सवाई गंधर्व यांच्या स्मृतीनिमित्त १९५२मध्ये या महोत्सवाचा प्रारंभ केला. तेव्हापासून गेल्या ६५ वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन केले जाते, यंदाचे हे ६६वे वर्ष आहे. सर्वसामान्य व्यक्तीलाही परवडेल अशा कमीत कमी तिकीट दरांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभिजात संगीताचा हा महोत्सव रसिकांना दरवर्षी अनुभवता येतो.

केवळ एका घराण्याचे संगीत संमेलन असे या महोत्सवाचे स्वरुप न ठेवता देशभरातील अनेक उत्तमोत्तम गायक आणि वादकांसाठी स्वरपीठ निर्माण व्हावे, असा प्रयत्न सातत्याने भीमसेन जोशी यांनी केला होता. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या निमित्ताने दिग्गजांच्या प्रत्यक्ष परफॉर्मन्सबरोबर, सांगीतिक गप्पा, संगीतावर आधारित लघुपट, कलावंतांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन असे अनेक उपक्रम यादरम्यान घेतले जातात.