जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा नुकताच पार पडला. दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील देहू आणि आळंदी परिसरात लाखो वैष्णव हा सोहळा अनुभवण्यासाठी आले होते. याचा फायदा घेऊन अनेक चोरटे आपला हात साफ करतात. परंतु, यावर्षी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केलेलं नियोजन यामुळे अवघ्या सात जणांची सोनसाखळी हिसकावल्याची नोंद आहे. गेल्या वर्षी दीडशे वारकरी आणि नागरिकांच्या सोनसाखळी हिसकावाल्याची नोंद पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यात होती. यावर्षी गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी, अधिकारी वेषांतर करून वारी दरम्यान वावरत होते. संशयितांवर लक्ष ठेवून होते.
पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात देहू आणि आळंदी समाविष्ट आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये तुकोबा आणि ज्ञानोबा यांचा पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहू आणि आळंदीत दाखल झाले होते. याच पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड पोलीस देखील सज्ज झाले होते. चार हजारा पेक्षा अधिक पोलीस वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सज्ज होते.
आणखी वाचा-पुणे: डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने पाऊल…’या’ देशांबरोबर सामंजस्य करार
गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी, अधिकारी वेशांतर करून वारीदरम्यान वारकऱ्यांसह फिरत होते. संशयीतांवर त्यांचं लक्ष होतं. पाकीटमार, सोनसाखळी चोर यावरती पोलिसांचे विशेष लक्ष होते. वॉचर्स म्हणून पर जिल्ह्यातून काही पोलिस कर्मचाऱ्यांना आणलं होतं. अँटी चेन स्नॅचिंगची बारा पथके तयार केली होती. याचा फायदा असा झाला की यावर्षी सोनसाखळी चोरीच्या अवघ्या सात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हेच प्रमाण गेल्यावर्षी दीडशे वर होतं तर २४० तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या कामगिरीमुळे पिंपरी- चिंचवड पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे.