पुणे : मा. दीनानाथ प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्ध पार्श्वगायिका संजीवनी भेलांडे यांना यंदाचा दीदी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

लता मंगेशकर यांच्या ९५ व्या जन्मदिनानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे २८सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या ‘ते श्री शारदा विश्वमोहिनी लतादीदी’ कार्यक्रमात तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते भेलांडे यांना दीदी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी शुक्रवारी दिली.

हे ही वाचा…VIDEO : पुण्यात रस्त्याला भगदाड, अख्खा ट्रक गेला खड्ड्यात, सिटी पोस्ट ऑफिसच्या परिसरातील घटना

कार्यक्रमाच्या पहिल्या भागात संजीवनी भेलांडे यांच्यासह अजित परब, मनीषा निश्चल आणि डाॅ. उन्मेष करमरकर काही गीते सादर करणार आहेत. दुसऱ्या भागात पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून तिसऱ्या भागात पं. हृदयनाथ मंगेशकर हे आठवणी सांगणार असून त्याला अनुसरून विभावरी आपटे-जोशी दीदींची गीते सादर करणार आहेत. सतीश पाकणीकर यांनी टिपलेली दीदींची छायाचित्रे पाहता येतील.

हे ही वाचा…हिंजवडी, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात गांजा विक्री करणारे गजाआड; ३३ किलो गांजा जप्त

लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी ६ फेब्रुवारी रोजी पुण्यात लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये एका मान्यवराला दीदीच्या नावाने तीन लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डाॅ. धनंजय केळकर आणि त्यांचे सहकारी या कार्यक्रमाचे नियोजन करणार आहेत.- पं. हृदयनाथ मंगेशकर, अध्यक्ष, लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन