विविध पक्षांची मंडळी एकत्र आल्यावर राजकीय कुरघोडय़ा आणि निवडणुकीतील खुन्नस हेच समीकरण आठवते.. आपापल्या जातीधर्माची संमेलने घेण्यात पुढाकार घेणारे विविध समाजांचे लोकही आपल्याच समाजाच्या कोंडाळ्यात वावरतात, इतरांशी फारसे मिसळत नाहीत.. पण गेले दहा दिवस ही सगळी मंडळी रोज एकत्र येत आहेत आणि एकमेकांशी ‘लढत’ आहेत.. निमित्त आहे, अखिल मंडई मंडळाने आयोजित केलेल्या ‘श्री शारदा गजानन एकात्मता करंडक’ क्रिकेट स्पर्धेचे!
या स्पर्धात आपल्या संघाला विजय मिळवून द्यायच्या जोशात राजकीय पक्ष आणि विविध समाजांचे संघ एकमेकांशी खेळत आहेत. तिथे चुरस आहे, पण खुनशीला जागा नाही.
या स्पर्धेचा उद्देश अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी सांगितला. ते म्हणाले, ‘‘२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आणि समाज यांनी खेळीमेळीच्या भावनेतून एकत्र यावे. निवडणुकांमध्ये कटुता राहू नये हाच उद्देश या स्पर्धेमागे आहे. राष्ट्रीय किंवा रणजी क्रिकेट खेळलेल्यांना या स्पर्धेत मनाई होती. नगरसेवक, पक्षांचे आणि समाजांचे पदाधिकारी, कार्यकर्ते खेळतील की नाही असे वाटले होते. पण कोणताही नियमित सराव नसताना सगळे खूप छान खेळले. वीसेक वर्षांपासून हातात बॅट न धरलेली मंडळीही उत्साहाने मैदानावर उतरली. ही स्पर्धा राजकीय पक्षाचा कार्यक्रम व्हायला नको यासाठी आम्ही विशेष काळजी घेतली आहे. त्यामुळेच उद्घाटन आणि बक्षीस समारंभही राजकीय नेत्यांच्या हस्ते ठेवला नाही.’’
सहभागी संघ-
राजकीय पक्ष- काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय, भाजप
समाज- मराठा समाज, ख्रिश्चन समाज, ओबीसी, ब्राह्मण महासंघ, मुस्लीम समाज, जैन संघटना, शीख समाज, माहेश्वरी समाज
अंतिम लढती-
वरिष्ठ गटात प्रथम क्रमांकासाठी शुक्रवारी (२० डिसेंबर) राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये अंतिम लढत होणार आहे. तर शिवसेना आणि आरपीआय तृतीय क्रमांकासाठी खेळणार आहेत. युवा गटात राष्ट्रवादी आणि भाजपची प्रथम क्रमांसाठी चुरस असून शिवसेना आणि मनसे यांच्यात झालेला सामना जिंकून शिवसेना तृतीय क्रमांकावर आहे. समाजांमध्ये वरिष्ठ गटात प्रथम स्थानासाठी ख्रिश्चन आणि जैन समाजात लढत होती. ती जिंकून ख्रिश्चन समाजाचा संघ अव्वल आला. तर ब्राह्मण आणि मराठा समाजातील सामन्यात ब्राह्मण समाजाने आघाडी घेऊन स्पर्धेत तृतीय स्थान पटकावले. युवा गटात प्रथम क्रमांकासाठी शुक्रवारी मराठा महासंघ विरूद्ध मुस्लीम समाज अशी लढत होईल. तर ओबीसी आणि शीख समाजाच्या सामन्यात ओबीसी समाज विजयी होऊन स्पर्धेत तृतीय स्थानावर राहिला.
मुस्लीम युवा ११९, काँग्रेस वरिष्ठ १०८!
दुसऱ्या पक्षाचे खेळाडू कसे खेळतील आणि किती ‘टफ’ देतील याची उत्कंठा मैदानावर पुरेपूर अनुभवल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ संघातून खेळलेले विक्रम खन्ना यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘काँग्रेसच्या वरिष्ठ गटाच्या संघाने स्पर्धेत राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक म्हणजे १०८ धावांचा विक्रम प्रस्थापित केला. तर मुस्लीम युवा संघाने ११९ धावांचा विक्रम केला. हे विक्रम मोडण्यासाठीची चुरस शेवटपर्यंत राहिली.’’
‘खरे स्पोर्टस्मन स्पिरिट दिसले’
जैन युवक महासंघाचे अध्यक्ष शरद शहा म्हणाले, ‘‘एरवी विविध समाज आपल्याआपल्यात खेळांचे सामने भरवतात. पण वेगवेगळ्या समाजांनी एकत्र येऊन खेळण्याची कल्पना खऱ्या ‘स्पोर्टस्मन स्पिरिट’चे दर्शन घडवणारी होती. जैन समाजाचा ब्राह्मण समाजाबरोबर झालेला सामना ‘लो स्कोअर’ पण अटीतटीचा ठरला. ब्राह्मण समाजाने केलेल्या ५१ धावांचा पाठलाग करण्यासाठी जैन समाजाच्या संघाला पूर्ण दहा षटके खेळावी लागली. ख्रिश्चन समाजाचा संघही खूपच छान खेळला.’’
‘राजकीय घोषणाबाजी नव्हती’
मैदानावर खेळाची चुरस जरूर होती, पण प्रतिस्पर्धी राजकीय पक्ष म्हणून खुन्नस अजिबात नव्हती, असे भाजप युवा मोर्चाच्या संघातून खेळलेले संतोष गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाच्या संघासमोर घोषणाबाजी करणे किंवा शेरेबाजी करणे असे या सामन्यांत दिसले नाही. भाजप युवा मोर्चाचा मनसेच्या युवा संघाबरोबर झालेला सामना खूपच रंगतदार होता. मनसेचा संघ खूपच तयारीने खेळत होता. आमच्या संघाची विशेष तयारी नसतानाही अटीतटीचा सामना होऊन आम्ही जिंकलो.’’