स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू हे ‘संस्कार’ आपल्या संस्कृतीमध्ये वर्षांनुवर्षे झाले आहेत. त्यातूनच स्त्रीभ्रूणहत्या आणि अत्याचार यांसारखी कृत्ये घडताना दिसतात. या पाश्र्वभूमीवर शिक्षणाने स्त्री सुशिक्षित झाली असली तरी ती अजूनही स्वतंत्र झालेली नाही. स्वातंत्र्य ही दुसऱ्याने देण्याची गोष्ट नाही हे ध्यानात घेतले पाहिजे, असे मत प्रसिद्ध लेखिका मंगला आठलेकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.
लायन्स क्लब ऑफ पुणे एलिट आणि क्रिप्स फाउंडेशन यांच्यातर्फे जीवनामध्ये संघर्ष करून यशस्वी झालेल्या विविध क्षेत्रांतील महिलांना स्वयंसिद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने ‘आरक्षण झाले, आता संरक्षण कधी’ या विषयावरील परिसंवादामध्ये मंगला आठलेकर यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक पुष्पा देशमुख, अभिनेत्री वंदना वाकनीस आणि प्राजक्ता माळी यांचा सहभाग होता.
मंगला आठलेकर म्हणाल्या, घराच्या चौकटीमध्येच मुली मन मारून जगतात. यामध्ये त्यांचे स्त्री आणि व्यक्ती म्हणून जगणे राहूनच जाते. केवळ चार टक्के मुली या बंधनांच्या विरोधामध्ये संघर्ष करतात. जोपर्यंत पुरुषांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत समतेच्या आधारे समाज परिवर्तन होणार नाही. त्यामुळेच पुरुषांची विचारसरणी बदलणे गरजेचे आहे.
पुष्पा देशमुख म्हणाल्या, घरातून पाठिंबा मिळाल्यामुळेच माझे करिअर घडू शकले. शिक्षणामुळे मुली आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली चमक दाखवित आहेत. आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्यांची कडक अंमलबजावणी तर होईलच. पण, मुलींनीही कायदे जाणून घेत आपल्या हक्कांसाठी जागरुक असले पाहिजे.
नव्या पिढीच्या कलाकारांना अभिनयापेक्षाही भाषेचे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मत वंदना वाकनीस आणि प्राजक्ता माळी यांनी व्यक्त केले. जयश्री पेंडसे यांनी प्रास्ताविक केले. संध्या देवरुखकर यांनी सूत्रसंचालन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा