पुणे : जिल्हा परिषद भरतीसाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे गेले चार वर्षे परीक्षांच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांना नव्या अभ्यासक्रमानुसार नव्याने अभ्यास करावा लागणार असून, भरती प्रक्रिया तोंडावर आलेली असताना अभ्यासक्रम बदलाबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात जिल्हा परिषद भरती प्रक्रिया २०१९ पासून रखडली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. त्या अंतर्गत जिल्हा परिषद भरती प्रक्रियाही राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठीच्या अभ्यासक्रमाचा शासन निर्णय ग्रामविकास विभागाने नुकताच प्रसिद्ध केला. प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांबाबत पुरेसे आकलन होत नसल्याने उमेदवारांकडून वारंवार विचारणा केली जात होती. त्यामुळे संवर्गनिहाय मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमापन या विषयांशी संबंधित प्रश्न, प्रश्नपत्रिकेचे स्वरुप, काठिण्य पातळी, वेळ त्यामुळे उमेदवारांच्या सुलभतेसाठी निश्चित करण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या अभ्यासक्रमाच्या स्वरूपानुसार पूर्वीच्या अभ्यासक्रमाच्या तुलनेत नव्या अभ्यासक्रमात बदल झाला आहे. त्यामुळे आता अचानक नव्या अभ्यासक्रमानुसार नव्याने तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून तयारी करणारे हजारो उमेदवार अडचणीत आले आहेत. अभ्यासक्रम बदलाबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद भरतीसाठी नुकताच नवीन अभ्यासक्रम जाहीर केला. उमेदवार २०१९पासून जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे अभ्यास करत आहेत. आता एकाएकी अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. अभ्यासक्रमाच बराच बदल झाल्याने उमेदवार अडचणीत आले आहेत. त्यातच अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेत नोकर भरती झाली नसल्याने उमेदवार नैराश्यात आहेत. ग्रामविकास विभागाने नियोजित वेळापत्रकात बदल न करता उमेदवारांच्या अभ्यासक्रमाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, असे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी सांगितले.