हजारो वाहनस्वार त्रस्त, पोलीस यंत्रणा हतबल
पिंपरीच्या मुख्य चौकातील वर्दळीचा रस्ता, समन्वयाअभावी मेट्रो आणि बीआरटीच्या कामाचा घोळ, रिक्षास्थानकांमुळे वाहतुकीला होणारे अडथळे, नागरिकांना प्रचंड त्रास होत असूनही डोळेझाक करणारे हतबल पोलीस, हे चित्र आहे पिंपरीतील दररोजच्या वाहतूक कोंडीचे. कित्येक वर्षांपासून ही परिस्थिती कायम असूनही मुजोर रिक्षाचालकांचा बंदोबस्त होत नसल्याने यात सुधारणा होताना दिसत नाही.
पिंपरीतील आंबेडकर चौक हा सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यापैकी एक आहे. सध्या या ठिकाणी मेट्रोचे खांब उभारणीचे काम सुरू आहे. येथून बीआरटीचाही मार्ग जातो. चौकातील हा रस्ता मुळातच अरुंद आहे. रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे मोठी वाहने उभी राहत असल्याने रस्ता खूपच अपुरा पडतो. विरुद्ध दिशेने वाहने येण्याचे प्रमाण जास्त असल्याने कोंडीत भरच पडते.
पिंपरी चौकाला सर्व बाजूने रिक्षाचालकांनी घेरले आहे. त्यामुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजलेले आहेत. पिंपरीतून चिंचवडकडे जाताना, पिंपरी चौकातून नेहरूनगरकडे जाताना, पिंपरीगावाकडे वळताना आणि खराळवाडीकडे येताना अशा चारही ठिकाणी रिक्षाचालक उभ्या-आडव्या पद्धतीने थांबलेले असतात. त्यांच्यामुळे वाहतुकीला अडथळे होतात. ते इतरांना रस्ता देत नाहीत. विशाल सिनेमाकडे वळताना हॉटेल रॉक्सीसमोर सर्वात भीषण परिस्थिती असते. खराळवाडीकडे जाण्याच्या सध्याच्या अतिशय अपुऱ्या रस्त्यावरही रिक्षाचालक ठाण मांडून बसलेले असतात. दररोज हजारो नागरिकांना याचा त्रास होतो. मात्र, त्याचे कोणाला सोयरसुतक नसते. वाहतूक पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर सर्व काही गेले आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून रिक्षाचालक मनमानी करताना दिसतात. नव्या पोलीस आयुक्तांनी शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पिंपरी चौकात त्यांनी लक्ष घातल्यास वर्षांनुवर्षे वाहतूक समस्येने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळू शकेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.