नदीपात्रात वाकड येथे हजारो मृत मासे आढळून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ठराविक कालावधीनंतर नेहमीच अशाप्रकारे मृत मासे नदीत आढळून येत असल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. वारंवार सांगूनही नदीप्रदूषणाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारा महापालिकेचा पर्यावरण विभागच या परिस्थितीस जबाबदार आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर, स्थानिक मच्छीमार या प्रकारामागे असल्याचा संशय पालिकेने व्यक्त केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नदीच्या पात्रात मृत मासे आढळून येत होते. मात्र, गुरुवारी हे प्रमाण प्रचंड वाढले. सकाळपासूनच वाकड स्मशानभूमीलगत नदीपात्रात हजारोंच्या संख्येने मृत मासे आढळून येऊ लागले. बरेचसे मासे काठावर तरंगताना दिसत होते. काही नागरिकांनी याबाबतची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मयूर कलाटे यांना दिली. त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी घटनास्थळी आले. पाण्याचे नमुने व काही मृत मासे ताब्यात घेऊन त्यांनी तपासणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवले. त्याचा अहवाल मिळल्यानंतर याबाबतचे नेमके कारण कळू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कलाटे यांनी पत्रकारांना सांगितले की, िहजवडी येथील रासायनिक कंपन्या थेटपणे नदीमध्ये सांडपाणी सोडतात, त्यामुळे नदी प्रदूषित होते. जलपर्णी व अन्य कारणांमुळे त्या प्रदूषणात भरच पडते. याबाबत पालिकेच्या पर्यावरण विभागाला सातत्याने कळवत होतो. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. दोन दिवसांपासून नदीत मृत मासे आहेत, त्याची माहिती कळवली होती. मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आज मृत माशांची संख्या पाहून त्यांना जाग आली. घटनास्थळी येणाऱ्या कुलकर्णी यांना वाकड व नदीपात्र सापडत नव्हते, ज्यांना पुरेशी माहिती नाही, असे अधिकारी काय काम करत असतील, असा मुद्दा कलाटे यांनी उपस्थित केला.
 
मच्छीमार दोषी -कुलकर्णी
म्हातोबानगर झोपडपट्टीतील मच्छीमार या ठिकाणी मासेमारी करतात. त्यांनी मोठय़ा प्रमाणात मासे मारून काठावर ठेवल्याचे आढळून आले आहे. संबंधितांविरुध्द विनापरवाना मासेमारी केल्याबद्दल तक्रार करण्यात येणार आहे, असे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा