पुणे : नवी पेठ येथील पूना हाॅस्पिटलमध्ये बाॅम्ब ठेवल्याची धमकी देणारा संदेश आल्यानंतर घबराट उडाली. गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी रुग्णालयाची पाहणी केली. तेव्हा बाँम्बसदृश कोणतीही वस्तू सापडली नाही. पाकिस्तानच्या क्रमांकावरून संदेश पाठवून रुग्णालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.
पोलीस नियंत्रण कक्षातील व्हाॅट्स ॲपवर रात्री साडेअकाराच्या दरम्यान पाकिस्तानच्या क्रमांकावरून एक संदेश आला. ‘पाकिस्तानी कैदीयोको छोड दो, वरना पूना हॉस्पिटल को बॉम्बसे उडा देंगे’ असा तो संदेश होता. ही माहिती विश्रामबाग पोलीस, तसेच बाॅम्ब शाेधक पथकाला देण्यात आली. बाँम्बच्या अफवेमुळे परिसरात घबराट उडली होती.
हेही वाचा >>>कोळशातून रेल्वे मालामाल! मध्य रेल्वेने कमावले ३ हजार ४२१ कोटी
बाॅम्ब शोधक पथकाने पूना हॉस्पिटलमधील मेडिकल, पार्किंग, प्रत्येक खोली आणि संशयास्पद वस्तूंची तपासणी केली. साधारणपणे दोन तास तपासणी करण्यात आली. यात कोठेही बाॅम्बसदृश वस्तू आढळून आढळून आली नाही. खोडसाळपणे पोलीस नियंत्रण कक्षाला संदेश केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस नियंत्रण कक्षाला संदेश पाठविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे नागरिक घराबाहेर पडले होते. त्यामुळे तेथे बघ्याची मोठी गर्दी निर्माण झाली होती. तर, रहदारीसाठी शास्त्री रस्ता आणि कर्वे रस्त्याला जोडणारा यशवंतराव चव्हाण पूल बंद करण्यात आला होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा लावण्यात आला होता.
हेही वाचा >>>पिंपरी- चिंचवडमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या, २७ पैकी १९ अधिकारी नागपूरचे
त्याबरोबर घटनास्थळी अपर पोलीस आयुक्त (दक्षिण) प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत कुवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ, विपीन हसबनीस, शब्बीर सय्यद या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पहाणी केली.