पुणे : समाजमाध्यमातून झालेल्या ओळखीतून ज्येष्ठ नागरिकाला धमकावून त्याच्याकडून चार लाख ६६ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी खंडणी उकळणाऱ्या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार शिवाजीनगर भागातील माॅडेल काॅलनी परिसरात राहायला आहेत. ते खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एका महिलेने संपर्क साधला. त्यानंतर महिलेने गोड बोलून त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर तरुणी आणि साथीदारांनी ज्येष्ठाला धमकावण्यास सुरुवात केली. त्यासाठी आरोपींनी वेगवेगळे मोबाइल क्रमांक वापरले.
अश्लील ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाकडून आराेपींनी वेळोवेळी चार लाख ६६ हजार रुपये उकळले. आरोपींकडून त्यांना धमकावण्याचे प्रकार सुरु होते. त्यांच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकाने सायबर गुन्हे शाखेत तक्रार अर्ज दिला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण तपास करत आहेत.
हेही वाचा >>> पुणे : निधनानंतर चोवीस तासांतच गिरीश बापट यांचे संपर्क कार्यालय सुरू
सेक्सटाॅर्शनचे बळी
गेल्या वर्षभरापासून शहरात अश्लील ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचे (सेक्सटाॅर्शन) प्रकार वाढीस लागले आहेत. सहा महिन्यांपूर्वी शहरात समाजमाध्यमात ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिल्याने दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
राजस्थानातील टोळ्या सक्रिय
पुणे पोलिसांनी सेक्सटाॅर्शन प्रकरणाचा तपास करुन राजस्थानातील दोन टोळ्यांना अटक केली होती. राजस्थानमधील गुरुगोठिया गाव परिसरातील टोळ्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले होते. या टोळ्यांनी देशभरात गुन्हे करुन नागरिकांकडून खंडणी उकळली होती.