शिरुर: शिरुर तालुक्यातील पूर्व भागातील  इनामगाव येथील हनुमानवाडी येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे.जेरबंद झालेली बिबट्याची मादी ही अंदाजे तीन ते साडेतीन वर्षाची असून जेरबंद केलेली ही मादी माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्र येथे नेण्यात आल्याची माहिती वनखात्याचा वतीने देण्यात आली आहे .तालुक्यातील पूर्व भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर असून पिंपळसुटी परिसरात बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी १३ ठिकाणी तर इनामगाव परिसरात ३ ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इनामगाव  मधील हनुमान वाडी येथील शेतकरी संपतराव यशवंतराव घाडगे यांच्या शेतामध्ये वनखात्याने  लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या भक्ष खाण्यासाठी आला असता अलगद जेरबंद झाला.ही माहिती व विभागाचे अधिकारी भानुदास शिंदे यांना देण्यात आली त्यानंतर तत्काळ वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी आले  या बिबट्याची रवानगी माणिक डोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आली आहे.

मागील काही महिन्यात पूर्व भागातील तीन लहानग्यांना बिबट्याचा हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी वंश सिंग, १५ नोव्हेंबर २०२४ रोजी टेभेकर वस्ती वरील शिवतेज टेंभेकर व २४ डिंसेबर २०२४ रोजी रक्षा निकम या चिमुकल्यांना प्राण गमवावे लागले आहेत. तर कुत्रा, शेळ्या, मेंढ्या, यांच्यावर ही हल्ले होत आहे.

साधारणपणे पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड याभागात काही वर्षापासून बिबट्यांचा वावर होता आणी आहे. पण मागील काही वर्षापासून शिरूर तालुक्यातील बिबट्याचा वावर आणि उपद्रव वाढला आहे. आता शिरूर तालुक्याची ओळख बिबट्याचा वावर असणारा तालुका अशी होवू लागली आहे. पूर्वी शिरूर तालुक्यातील जांबूत,पिंपरखेड, टाकळी हाजी, फाकटे, कवठे येमाई या बेट भागात असणारा  बिबट्याचा वावर  मांडवगण फराटा, वडगाव रासाई,पिंपळसुटी,इनामगाव, न्हावरा या पूर्व भागात ही  वाढला आहे.

 शिरूर तालुक्या हा तसा दुष्काळी तालुक्या होता. परंतु तालुक्यात डिंभा,व चासकमान कालवाचे आलेले पाणी व विविध नद्या यामुळे बागायती क्षेत्र वाढले. त्यात ही उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.  साहजिकच मागील काही वर्षापासून उसाचे क्षेत्र ही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे .उस क्षेत्र हे बिबट्याचा वास्तव्यासाठी अनुकूल ठरत आहे. उसाचा पिका मध्ये बिबटे आपल्या निवारा करत आहे. त्याच प्रमाणे पाण्याची सहज उपलबध्ता, बिबट्याला लपण्यासाठीचे मोठ्या प्रमाणावर लपनक्षेत्र आणि बिबट्यांचे भक्ष्य असणारे शेळ्या ,मेंढ्या व कुत्र्यांची उपलब्धता यामुळे त्याला शिकार ही उपलब्ध होते. त्याखेरीज या परिसरातील बिबट्याची पिढी या उसाचा क्षेत्रातच वाढली असल्याने परिसराशी त्यानी समायोजन केले आहे. साहजिकच या परिसरात बिबट्यांची संख्या वाढली असून भक्ष्य न मिळाल्यास हा बिबट्या मानवी वस्तीकडे धाव घेवून हल्ले ही करू लागला आहे.  यामुळे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे .