लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : शहरात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असून गेल्या दहा दिवसांत तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पीने ३० जनावरे बाधित आहेत. बाधित जनावरांवार उपचार सुरु आहेत. निरोगी जनावरांचे लसीकरण करण्यात येत असल्याचे पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.
शहरात मोकाट फिरणारी व पाळीव जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लम्पीची साथ नियंत्रणात असली, तरी मागील दहा दिवसांमध्ये जनावरांना लम्पी रोगाची लागण होत असल्याचे आढळून आले. दहा दिवसांत २५ जनावरांना लागण झाली आहे. पशुवैद्यकीय विभागाकडून उपचारासाठी एक आणि लसीकरणासाठी एक अशी दोन पथके नियुक्त केली आहेत. त्यांच्यामार्फत जनावरांवर लसीकरण, उपचार सुरू आहेत. बाधित जनावरांच्या गोठ्यात जाऊन उपचार केले जात आहेत. च-होली, चिखली, मोशी, निगडी या भागात बाधित जनावरे आढळत आहेत. आजपर्यंत बाधित २५० जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले. तीन हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
आणखी वाचा-पुणे: कौटुंबिक वादातून महिलेचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर
लम्पी आजार प्रतिबंधक लसीकरणासाठी राज्य शासनाकडून एक पथक मदतीसाठी मिळणार आगे. त्यामुळे लसीकरणाला गती येऊ शकेल. सध्या दररोज ४० जनावरांचे लसीकरण केले जात आहे. ही गती वाढवून दररोज ६० जनावरांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे.
लम्पीची लागण झालेल्या जनावरांमध्ये वाढ होत आहे. बाधित जनावरांवर तत्काळ उपचार करत आहोत. तीन जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे. दोन शेतक-यांच्या आणि एक भटकी गाय होती. लम्पीने ३० जनावरे बाधित आहेत. -संदीप खोत, उपायुक्त, पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका