पिंपरी : निवृत्त सरकारी कर्मचा-यांना पॉलिसी काढण्याचे आमिष दाखवून त्यांची तब्बल दोन काेटी ३० लाख रूपयांची फसवणूक करणा-या तिघांना पिंपरी-चिंचवड सायबर पाेलिसांनी गजाआड केले. दाेघांना दिल्लीतून तर एकाला पुण्यातून अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा लाखांची राेकड, पैसे मोजण्याची एक मशीन आणि कागदपत्रे पाेलिसांनी जप्त केली आहेत.
दिल्लीतून भुपेंदंर जिवनसिंग जिना, लक्ष्मण सिंग सन ऑफ हरेंदर सिंग तर पुण्यातून लक्ष्मणकुमार पुनारामजी प्रजापती अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. सायबर पोलीस ठाणे येथे दाखल असणा-या गुन्ह्यातील फिर्यादी यांना यातील आरोपी यांनी इन्शुरन्स कंपन्यामधुन बोलत असल्याचे सांगुन पॉलिसी काढल्यास जास्त माेबादला मिळेल, असे अमिष दाखविले. त्यासाठी जीएसटी, इनकम टॅक्स, टिडीएस, ट्राझेक्शन चार्जेस, व्हेरीफिकेशन चार्जेस, एनओसी चार्जेस असे भरावे लागतील, असे सांगून विश्वास संपादन केला. ती सर्व रक्कम फिर्यादी यांना थोड्या दिवसानंतर परत करण्याचे अमिष दाखवून दोन काेटी ३० लाख आठ हजार ८९८ रूपये भरण्यास भाग पाडले. यामधील एक काेटी ६१ लाख ४० हजार रूपये आराेपी प्रजापती याने घेतले हाेते.
त्यानुसार पाेलिसांनी तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेतला. आराेपी पुण्यातील रविवार पेठेत असल्याची माहिती मिळाली. पाेलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर दहा लाख राेख, पैसे माेजण्याची मशीन व काही कागदपत्रे जप्त केली. आराेपीच्या चाैकशीमध्ये आणखी दाेन आराेपी यामध्ये असल्याचे निष्पन्न झाले. आराेपी भुपेंदंर जिवनसिंग जिना, लक्ष्मण सिंग सन ऑफ हरेंदर सिंग यांचे लोकेशन दिल्लीतील असल्याची पाेलिसांना मिळाली. त्यांनी पाेलिसांनी १५ दिवस दिल्लीत आराेपींचा शाेध घेऊन अटक केली.
ही कारवाई पाेलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पाेलीस आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अपर पाेलीस आयुक्त वसंत परदेशी, पाेलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक पाेलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पाेलीस निरीक्षक प्रविण स्वामी, सागर पोमण, वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, विदया पाटील, दिपक भोसले, हेमंत खरात, नितेश बिच्चेवार, अतन लोखंडे, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले, विशाल निचीत, दिपाली चव्हाण, प्रिया वसावे, भाविका प्रधान यांच्या पथकाने केली.