लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान आवास योजनेत अनुदान मंजूर करण्यासाठी ५० हजारांची लाच घेणाऱ्या पुणे महानगर विकास प्राधिकरणातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अभियंत्यांसह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. सासवड परिसरात ही कारवाई करण्यात आली.
तेजस संपत तावरे (वय ३२), हेमंत लालासाहेब वांढेकर (वय २९), रामदास उर्फ बाबू मारुती कटके (वय ४८, रा. भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये बुधवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराने त्यांच्या वडिलांच्या नावे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अनुदान मंजूर करण्यासाठी अर्ज केला होता. पुणे महानगर विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) कंत्राटी पद्धतीने काम करणारे अभियंता तेजस तावरे, हेमंत वांढेकर यांनी अडीच लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यासाठी लाच मागितली होती.
आणखी वाचा-शहरबात : सावध ऐका, पुढच्या हाका! हिंजवडी आयटी पार्क, चाकण एमआयडीसीनंतर आता कोण…
तक्रारदाच्या वडिलांना अडीच लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले. पहिल्या हप्त्यापोटी त्यांना एक लाख रुपये मिळाले होते. उर्वरित दीड लाख रुपये तक्रारदाराच्या वडिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी पीएमआरडीएत कंत्राटी पद्धतीने काम करणारे अभियंता तावरे, वांढेकर यांनी मध्यस्थ कटके याच्यामार्फत तक्रारदाराकडे ५० हजारांची लाच मागितली होती. कटके याने पीएमआरडीए कार्यालयात ओळख असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. कटकेने तक्रारदारांना ५० हजार रुपये घेऊन सासवड बसस्थानक परिसरात बुधवारी बोलाविले. सापळा लावून तक्रारदाराकडून ५० हजारांची लाच घेणाऱ्या कटकेला पकडले.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.
© The Indian Express (P) Ltd