पिंपरी- चिंचवड : पुण्यातील तळेगावमध्ये बेकायदेशीररित्या राहत असलेल्या तीन बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. तळेगाव एम.आय.डी.सी पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीसी) त्यांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वारंवार बेकायदेशीररित्या बांगलादेशी राहत असल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे. हुसेन शेख, मोनिरुल गाजी आणि अमीरूल साना अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नाव आहेत. तळेगाव एमआयडीसी मध्ये नवलाख उंबरे परिसरात भाड्याच्या खोलीत ते राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव एम.आय.डी.सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवलाख उंबरे येथे पाण्याच्या टाकी जवळ एका खोलीत बंगाली बोलणारे तीन व्यक्ती राहत असून ते बांगलादेशी असण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती एटीसी ला मिळाली. बातमीची खात्री करून तिथं पंचा समक्ष पोलीस पोहचले.
आणखी वाचा-वाकडमध्ये पान टपरीतून विकला जात होता गांजा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
चौकशीत खोली क्रमांक- ४४ मध्ये हुसेन शेख, मोनिरुल गाझी आणि अमिरुल साना हे बांगलादेशी राहात असल्याचं निष्पन्न झाले. ते बांगलादेश मधील सातखीरा जिल्ह्यातील आहेत. त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, पश्चिम बंगाल येथील जन्माचा दाखला, भारतीय ई- श्रम कार्ड तसेच बांगलादेशी पासपोर्ट, बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र मिळालं आहे. तिन्ही बांगलादेशीच्या मोबाईलमधून बांगलादेश येथे विविध मोबाईल नंबर वर फोन लावल्याच उघड झाले आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपापासून ते भारतात राहत आहेत. गेल्या आठ महिन्यापासून ते पुण्यातील नवलाख उंबरे इथे राहत असून जवळच्या कंपनीत काम करत होते.