पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या तीनही इमारतींची कामे अर्धवट

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : बहुप्रतीक्षित पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या उद्घाटनाची तयारी सुरू असून उद्घाटनाचा दिनांक अधिकृतरीत्या जाहीर झालेला नसला तरी १५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नव्या आयुक्तालयासाठी आयुक्तांसह इतर वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. उद्घाटनाचा घाट घातला जात असला तरी आयुक्तालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम अद्यापही अर्धवट असून अन्य दोन इमारतींच्या डागडुजीला अद्याप सुरुवातही करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तालय या महिन्यात सुरु होईल की नाही याबाबत शंकाच आहे.

राज्य सरकारने पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची घोषणा केली. नवीन पोलीस आयुक्तालयामध्ये पंधरा पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. या पंधरा पोलीस ठाण्यांमधील चिखली पोलीस ठाण्याला एक वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली आहे. मात्र, जागेअभावी ते सुरु होऊ शकले नाही.पोलीस आयुक्तालयाची घोषणा झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने आयुक्तालयासाठी जागेचा शोध सुरु केला. महापालिकेने पोलीस आयुक्तालयासाठी चिंचवड येथील व्यापारी संकुल, प्रेमलोक पार्क चिंचवड येथील महापालिकेची शाळा आणि निगडी वाहतूकनगरी येथील महापालिकेची शाळा या तीन इमारती देण्यास मंजुरी दिली. पोलीस प्रशासनानेही या इमारतींना पसंती दर्शविली. आयुक्तालयाची घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी भाजपने १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्याचे नियोजन केले होते. तशी घोषणाही केली होती. मात्र, ही घोषणा हवेतच विरण्याची शक्यता आहे.

सध्या प्रेमलोक पार्कमधील शाळेच्या इमारतीचे डागडुजीचे काम सुरु आहे. या इमारतीची रंगरंगोटी तसेच अंतर्गत दुरुस्ती सुरु आहे. फरशा बसविणे, खिडक्यांच्या फुटलेल्या काचा, विस्कळीत वायरिंग, कार्यालयासाठी वापरण्यात येणाऱ्या खोल्यांची रचना बदलून नवीन रचनेनुसार दरवाजे बसविणे आदी कामेही सुरु आहेत. फर्निचरचे काम अद्याप सुरु झालेले नाही. आतापर्यंत या इमारतीच्या डागडुजीचे काम पन्नास टक्क्य़ांच्या आसपासही झालेले नाही. इमारतीचे बाहेरच्या बाजूने रंगकाम झाले आहे.

चिंचवड येथील व्यापारी संकुलातील एक मजला आणि निगडी येथील दोन मजली शाळा आयुक्तालयासाठी दिली जाणार आहे. या दोन्ही इमारतींचे डागडुजीचे अंदाजपत्रकच अद्याप तयार झालेले नाही. अंदाजपत्रक तयार करुन त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात तरी आयुक्तालय सुरु होईल की नाही याबाबत साशंकता आहे. नियोजित पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी गेल्या तीन दिवसांपासून सूचना देत आहेत.

पोलीस आयुक्तालयाच्या प्रेमलोक पार्क येथील नियोजित इमारतीचे डागडुजीचे काम सुरु आहे. चिंचवड आणि निगडी येथील इमारतींच्या डागडुजीसाठी आवश्यक कामाचे अंदाजपत्रक तयार करुन ते मंजूर झाल्यानंतर तेथील कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three buildings for pimpri chinchwad police commissionerate partially completed