लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर पाळत ठेवून त्यांची फसवणूक करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. मदत करण्याच्या बहाण्याने एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांचे एटीएम कार्ड आणि सांकेतिक शब्द घेऊन चोरटे फसवणूक करत असल्याचे दिसून आले आहे. अशा प्रकारचे तीन गुन्हे लष्कर, कोथरुड आणि पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
लष्कर भागातील ईस्ट स्ट्रीट परिसरातील एका एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठाच्या खात्यातून ११ हजार ५०० रुपयांची रोकड चोरुन नेण्यात आली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक कोढवा भागात राहायला आहेत. ते २ फेब्रुवारी रोजी ईस्ट स्ट्रीट परिसरातील एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांच्यामागोमाग एक चोरटा एटीएममध्ये शिरला. त्यांना मदत करण्याचा बहाणा करुन त्यांच्याकडील एटीएम कार्ड घेतले. त्यांच्याकडून सांकेतिक शब्द (पासवर्ड) घेतला. त्यानंतर चोरट्याने त्याच्याकडील एटीएम कार्डचा वापर करुन पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर पैसे निघाले नाहीत.
एटीएममध्ये बिघाड झाल्याचे सांगून पैसे निघत नाहीत, असे चोरट्याने त्यांना सांगितले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक तेथून गेले. एटीएम कार्डचा गैरवापर करुन चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून साडेअकरा हजार रुपये चोरुन नेले. ८ फेब्रुवारी रोजी खात्यातून पैसे चोरीला गेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार सचिन मांजरे तपास करत आहेत.
पौड रस्त्यावरील आनंदनगर भागातील एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेची चोरट्यांनी फसवणूक केली. एटीएम कार्ड चोरुन त्यांच्या खात्यातून एक लाख रुपयांची रोकड चोरुन नेली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला कोथरूड भागातील आयकर काॅलनीत राहायला आहेत. सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार तपास करत आहेत.
ज्येष्टाची साडेतीन लाखांची फसवणूक
धनकवडी भागातील एका एटीएम केंद्रातून रोकड काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाची चोरट्याने साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ज्येष्ठाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार धनकवडी भागात राहायला आहेत. धनकवडीतील तीन हत्ती चौक परिसरात असलेल्या एका एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांच्या पाठोपाठ चोरटा एटीएमध्ये शिरला. एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला मदतीचा बहाणा केला. त्यांच्याकडील एटीएम कार्ड, सांकेतिक शब्द घेतला. त्या बदल्यात चोरट्याने त्याच्याकडील एटीएम कार्ड दिले. पैस निघत असल्याची बतावणी करुन चोरटा तेथून निघून गेला. त्यानंतर ज्येष्ठाच्या खात्यातून तीन लाख ५५ हजार रुपयांची रोकड चोरण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक एस. डी. फकीर तपास करत आहेत.