दुकान बंद केल्यानंतर थंड पेय न दिल्यामुळे झालेल्या वादातून दुकानदारावर तलवारीने वार केल्याची घटना शनिवारी रात्री येरवडा येथील गणेशनगरमध्ये घडली. यामध्ये तरुण गंभीर जखमी असून या प्रकरणी येरवडा पोलिसांनी चार जणांस अटक केली आहे.
अजय शेडगे (वय २७, रा. येरवडा) अशी जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अजयचा भाऊ अमोल शेडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संकेत सुरेश कांबळे (वय १९), तौसीफ रफीक कुरेशी (वय २६), तन्वीर अहमंद शेख (वय २१) आणि मुनान सत्तार अन्सारी (वय २४, रा. सर्व जण येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडय़ातील गणेशनगर येथे शेडगे याचे अमोल जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. हे दुकान शेडगे यांच्या आई चालवितात. शनिवारी रात्री साडेआठ वाजता दुकान बंद केल्यानंतर कांबळे हा त्या ठिकाणी आला. त्याने शेडगे यांच्या आईला थंड पेय देण्यास सांगितले. त्यांनी दुकान बंद झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या अजयच्या डोक्यात तलवारीने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अजय गंभीर जखमी असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करून येरवडा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एन. एफ. शेख हे अधिक तपास करीत आहेत.  
स्वारगेटजवळ कालव्यात मृतदेह आढळला
खून करून मृतदेह टाकल्याची शक्यता  
स्वारगेट येथील कालव्यामध्ये रविवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीच्या अंगावर जखमा असल्याचे आढळून आल्यामुळे या व्यक्तीचा खून करून मृतदेह कालव्यात टाकल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजी दादाराव ओव्हाळ (वय ४०, रा. लातूर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट येथील कालव्यामध्ये रविवारी सकाळी नागरिकांना मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या फोटोवरून त्यांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. दुपारी त्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. मृतदेहाच्या गळ्यावर, पोटावर आणि पाठीवर चाकूने वार केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हा खुनाचा प्रयत्न असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. ओव्हाळ हे मूळचे लातूरचे रहिवासी असून तीन ते चार आठवडय़ांपूर्वी ते मुंबईला गेले होते. त्या ठिकाणाहून पुण्याला आले होते. दांडेकर पूल परिसरात नातेवाइकांकडे राहण्यास होते.
भोसरीत तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
भोसरी येथे तीन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
सागर अरुण चव्हाण (वय २५, रा. भोसरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी एका २७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण हा मूळचा बुलढाणा जिल्ह्य़ातील असून पुण्यात कामासाठी आला आहे. भोसरीत नातेवाईकाकडे राहत होता. त्यावेळी त्याचे नातेवाईक घराबाहेर गेल्यानंतर चव्हाण याने घरासमोर खेळत असलेल्या  तीन वर्षांच्या मुलीला घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चव्हाण याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम. जे. दशवंत अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader