पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय समन्वय बैठक पुण्यात होणार आहे. मात्र, या बैठकीमुळे दोन शाळा आणि एका महाविद्यालयाला तीन दिवस सुटी देण्यात आली आहे. या प्रकाराबाबत विद्यार्थी संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. संघाच्या राष्ट्रीय समन्वय बैठकीसाठी देशभरातील स्वयंसेवक पुण्यात आले आहेत.  ही बैठक स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. या बैठकीसाठी मैदानावर मंडपाची उभारणी करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरसंघचालक मोहन भागवत, सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा बैठकीला उपस्थित राहणार आहेत.  या पार्श्वभूमीवर शिक्षण प्रसारक मंडळीच्या टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, एसपीएम इंग्रजी माध्यम शाळा आणि मूकबधीर शाळा यांना तीन दिवस सुटी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शासकीय कार्यक्रमांबाबत काहीच अडचण नाही. मात्र शहरात अन्यत्र  सोय असताना स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर कार्यक्रम घेण्याचे कारण काय, विद्यार्थ्यांना परस्पर सुटी कशी काय दिली जाऊ शकते, संघाचा कार्यक्रम हा शासनाचा अधिकृत कार्यक्रम समजायचा का, असा सवाल स्टुडंट हेल्पिंग हँडच्या कुलदीप आंबेकर यांनी उपस्थित केला.  तर करोनामुळे बिघडलेले शैक्षणिक वेळापत्रक आता कुठे पूर्वपदावर येत आहे. गणेशोत्सवासाठी सुटी दिली जाणार असताना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीसाठी तीन दिवस विद्यार्थ्यांना सुटी देणे स्वीकारार्ह नाही, असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी सांगितले. 

आजपासून पुण्यात बैठक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय समितीची तीन दिवसीय बैठक गुरुवारपासून सुरू होणार आहे. देशातील सद्य:स्थितीतील सामाजिक-राजकीय आणि आर्थिक परिस्थिती, विविध ज्वलंत प्रश्नांवर या बैठकीत उहापोह होणार असून, भूज येथे नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या संघाच्या बैठकीत याबाबत अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय समिती बैठक १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत या बैठकीची माहिती दिली.

एसपीएम इंग्लिश मीडियम शाळा, मूकबधीर शाळेत जास्तीचे वर्ग घेऊन शैक्षणिक कामकाज पूर्ण केलेले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. – अ‍ॅड. एस. के. जैन, नियामक मंडळ अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three days holiday for two schools one college due to sangh meeting ysh