पुणे : गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात सर्वदूर होत असलेला पाऊस पुढील तीन दिवस विश्रांती घेण्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागात पाऊस उघडीप घेण्याची शक्यता आहे. किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार सरींची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन आठवड्यांपासून कोकण किनारपट्टी, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात असलेला पावसाचा जोर शुक्रवारी (२६ जुलै) कमी झाला आहे. पुढील तीन दिवस किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवार आणि गुरुवारी असलेला पावसाचा जोर गुरुवारी रात्रीपासूनच कमी झाला आहे. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कमी होता. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत लोणावळ्यात २४४, शिरगाव येथे २५४, आंबोणे येथे २५७, कोयना (नवजा) २३७, खोपोली २२१, ताम्हिणी २८४ आणि भिरा येथे २३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाट परिसरात पुढील दोन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. गेले दोन दिवस पुण्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने शुक्रवारी पुण्यात विश्रांती घेतली. दिवसभरात एक-दोन हलक्या सरी पडल्या. शुक्रवारी दिवसभरात शिवाजीनगरमध्ये १.२ आणि लवळे येथे १.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा – पिंपरी : दुथडी वाहणारी इंद्रायणी, तीन तास बचाव कार्याचा थरार, तीन गायींना जीवनदान!
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील पाणीपुरवठा विस्कळीत; ‘हे’ आहे कारण
शनिवारसाठी इशारा
नारंगी इशारा – पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया
पिवळा इशारा – मुंबई, ठाणे, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भ
© The Indian Express (P) Ltd