पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन पादचाऱ्यांसह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पुणे-नगर रस्ता आणि सोलापूर रस्ता परिसरात अपघाताच्या घटना घडल्या.
पुणे-सोलापूर रस्त्यावरील बोरकर वस्ती भागात झालेल्या अपघातात वसंत ज्ञानोबा पोळ (वय ६०, रा. बोरकर वस्ती) यांचा मृत्यू झाला. पोळ सोलापूर रस्त्याने निघाले होते. त्या वेळी थेऊरकडे निघालेल्या भरधाव वाहनाने पोळ यांना धडक दिली. अपघातात पोळ यांचा मृत्यू झाला. पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अनिकेत वेताळ (वय २८) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा – भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्याकडे २५ लाखांची खंडणी
नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात तुळापूर फाटा ते आळंदी रस्त्यावर एका पादचाऱ्याला भरधाव वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. विनोदकुमार मेवालाल (वय ३४, रा. लोणीकंद फाटा, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. मेवालाल लोणीकंद परिसरातील एका खासगी कंपनीत कामाला होते. रात्रपाळीत काम आटोपून ते तुळापूर-आळंदी रस्त्याने निघाले होते. त्या वेळी रस्ता ओलांडणाऱ्या मेवालाल यांना भरधाव वाहनाने धडक दिली. लोणीकंद पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे तपास करत आहेत.
हेही वाचा – पुणे : शहर पदाधिकाऱ्यांविरोधात मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे पुन्हा नाराज
पुणे-नगर रस्त्यावर भरधाव वाहनाने दुचाकीस्वार तरुणाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गौरव रवींद्र कुमार असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत गौरवचा मित्र सौरभ कुमार (वय १८) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव आणि त्याचा मित्र मोहित दुचाकीवरून निघाले होते. नगर रस्त्यावर भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. अपघातात गौरवचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक सुहास पाटील तपास करत आहेत.