संपूर्ण पुणे शहरात बांधकामासाठी तीन चटईक्षेत्र निर्देशांक देण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी ठाम विरोध केला असून शहरात तीन एफएसआय देणे चुकीचे ठरेल अशी स्पष्ट भूमिका चव्हाण यांनी शनिवारी पक्षाच्या बैठकीत मांडली. पक्षातील अनेक पदाधिकारी आणि नगरसेवकांनी मात्र तीन एफएसआय देण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला आहे.
पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा नियोजन समितीकडून महापालिकेच्या मुख्य सभेला सादर झाला आहे. मूळच्या विकास आराखडय़ात मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला पाचशे मीटपर्यंत चार चटईक्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स- एफएसआय) देण्याचा प्रस्ताव होता. मात्र मेट्रो मार्गाच्या बाजूला चार एफएसआय देण्याऐवजी संपूर्ण शहरात तीन एफएसआय द्यावा अशी शिफारस नियोजन समितीच्या आराखडय़ात करण्यात आली आहे. या शिफारशीसह आराखडय़ातील अन्यही अनेक शिफारशींबाबत राजकीय पक्षांमध्ये वाद निर्माण झाला असून विकास आराखडय़ावरील चर्चा मुख्य सभेत मंगळवार (२४ फेब्रुवारी) पासून सुरू होणार आहे. आराखडय़ातील विविध शिफारशींबाबत पक्षाची भूमिका निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक शनिवारी बोलावण्यात आली होती. महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृहनेता सुभाष जगताप आणि नगरसेवक व पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते.
बैठकीत शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी तीन एफएसआय देण्याच्या शिफारशीला विरोध करून एफएसआय देणे चुकीचे ठरेल, असेही सांगितले. आराखडा राज्य शासनाला सादर करण्यासाठी महापालिकेला मिळालेल्या मुदतीत एक महिना वाढ करून घेण्याबाबत वंदना चव्हाण यांनी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुदतवाढ मागण्याचे पत्र देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट, तसेच वंदना चव्हाण, महापौर, सभागृहनेता मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहेत. वाढत्या शहराचा विचार करता शहरात तीन एफएसआय देणे योग्य ठरेल, अशी भूमिका अनेक जणांनी बैठकीत घेतली. विकास आराखडय़ाची प्रक्रिया सुरू असताना तसेच हरकती-सूचनांवरील सुनावणी घेताना आमच्या प्रभागातील जे प्रस्ताव होते त्याबाबत आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही, अशी तक्रार अनेक नगरसेवकांनी बैठकीत केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा