लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कंठसंगीत, वादन आणि नृत्य असा अभिजात संगीताचा त्रिवेणी आनंद देणाऱ्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त पं. अजय चक्रवर्ती, कौशिकी चक्रवर्ती आणि रिषित देसिकन अशा तीन पिढ्यांचा स्वराविष्कार रसिकांना अनुभवण्याची संधी लाभणार आहे. महिला कलाकारांचा सहभाग असलेला ‘मोहिनी’ हे अनोखे सादरीकरण, प्रसिद्ध गायक-संगीतकार अदनान सामी यांचे शास्त्रीय पियानो वादन आणि किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना शिष्यांनी आपल्या गायनातून वाहिलेली स्वरांजली ही यंदाच्या महोत्सवाची वैशिष्ट्ये आहेत.
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे १८ ते २२ डिसेंबर या कालावधीत यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाचे यंदा ७० वे वर्ष असून युवा पिढीच्या आश्वासक कलाकारांबरोबरच बुजुर्ग कलाकार आपली सेवा रूजू करणार आहेत, अशी माहिती देत मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी शुक्रवारी यंदाच्या वर्षी आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांची घोषणा केली.
आणखी वाचा-घरांच्या विक्रीला एप्रिलपासून लागलेली घरघर अखेर थांबली; पुण्यात यंदा गृहखरेदीची ‘दिवाळी’
बुधवार १८ डिसेंबर (दुपारी ३ ते रात्री १०)
- डॉ. एस बल्लेश आणि डॉ कृष्णा बल्लेश (सनईवादन)
- शाश्वती चव्हाण- झुरुंगे (गायन)
- डॉ. राम देशपांडे (गायन)
- डॉ. एल. सुब्रमण्यम (व्हायोलिनवादन)
- पं. अजय चक्रवर्ती (गायन)
गुरुवार १९ डिसेंबर (दुपारी ४ ते रात्री १०)
- कृष्णा बोंगाणे आणि नागेश आडगांवकर (सहगायन)
- संगीता कट्टी- कुलकर्णी (गायन)
- अनुपमा भागवत (सतारवादन)
- पं व्यंकटेश कुमार (गायन)
शुक्रवार २० डिसेंबर (दुपारी ४ ते रात्री १०)
- ‘मोहिनी’ संगीत समूह यांच्या सादरीकरण : सहभाग – सहाना बॅनर्जी (सतार), रुचिरा केदार (गायन), सावनी तळवलकर (तबला), अनुजा बोरुडे- शिंदे (पखवाज), अदिती गराडे (संवादिनी)
- विराज जोशी (गायन)
- कौशिकी चक्रबर्ती आणि रिषित देसिकन (सहगायन)
- पूरबायन चटर्जी (सतारवादन)
शनिवार २१ डिसेंबर (दुपारी ४ ते रात्री १२)
- सौरभ काडगांवकर (गायन)
- अयान अली बंगश आणि अमान अली बंगश (सरोद जुगलबंदी)
- आनंद भाटे (गायन)
- राकेश चौरासिया (बासरीवादन)
- आरती अंकलीकर-टिकेकर (गायन)
- पं. उल्हास कशाळकर (गायन)
रविवार २२ डिसेंबर (दुपारी १२ ते रात्री १०)
- संजीव अभ्यंकर (गायन)
- शशांक सुब्रमण्यम (बासरी) आणि आर. कुमरेश (व्हायोलिन-सहवादन)
- मिलिंद चित्ताळ (गायन)
- अदनान सामी (शास्त्रीय पियानो वादन)
- शोभना (भरतनाट्यम नृत्य)
- डॉ. प्रभा अत्रे यांना स्वरांजली (सहगायन – आरती ठाकूर-कुंडलकर, अतींद्र सरवडीकर, चेतना पाठक, अश्विनी मोडक)