शहराच्या मध्यवस्तीत घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या चोरटय़ांना खडक पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
मंगेश संजय पवार (वय १९, रा. मरळनगर, कोंढवा खडी मशीन चौक), सलमान हमीद शेख (वय १८, रा. मीठानगर, कोंढवा), विकास अशोक त्रिपाठी (वय १९, रा. सिखरापूर, उत्तरप्रदेश) आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. टिंबर मार्केट परिसरातील व्यापारी राजेश जैन यांचे प्लायवुड विक्रीच्या दुकानाचा दरवाजा उचकटून पवार आणि त्याचा साथीदार शेख याने लॅपटॉप, रोकड, चांदीची नाणी असा माल चोरुन नेला होता. या गुन्ह्य़ाचा तपास करणारे पोलीस शिपाई इम्रान नदाफ यांना चोरटे पवार आणि शेख यांच्याविषयी माहिती मिळाली. त्याआधारे दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ऐंशी हजारांचा माल जप्त करण्यात आला असून घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले आहे.
दरम्यान, शुक्रवार पेठेतील चिंचेची तालीम चौकातील सार्वजनिक मंडळाच्या मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लांबविणारा चोरटा विकास त्रिपाठी याला पकडण्यात आले. त्याच्याकडून दोन हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. गंज पेठेतील रहिवाशी रवी पिटालू यांची दुचाकी चोरुन पसार झालेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंत व्यवहारे, सुरेश सोनवणे, एकनाथ कंधारे, विजय कांबळे, महेंद्र पवार, सर्फराज शेख, इम्रान नदाफ, प्रदीप शिंदे, अनिकेत बाबर, दीपक धाबेकर, अशोक माने यांनी ही कारवाई केली.

Story img Loader