पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागांत पीएमपी बसमध्ये प्रवासी महिलांकडील दागिने चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या. कात्रज ते अरण्येश्वर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कात्रज-कोंढवा रस्त्यावर राहायला आहेत. त्या शुक्रवारी (२६ एप्रिल) पीएमपी बसने कात्रज परिसरातून निघाल्या. अरण्येश्वर येथील थांब्यावर त्या उतरल्या. तेव्हा त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात आले. महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस फौजदार बापू खुटवड तपास करत आहेत.
निगडी ते पुणे स्टेशन या मार्गावरील बसमधून प्रवास करणाऱ्या एका ३३ वर्षीय महिलेच्या पिशवीतून एक लाख १७ हजार रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आले. १८ एप्रिल रोजी ही घटना घडली. याबाबत महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला निगडीत राहायला आहेत. त्या कामानिमित्त पुणे स्टेशन परिसरात आल्या होत्या. बस प्रवासात चोरट्याने दागिने चोरल्याचा प्रकार पुणे स्टेशन स्थानकात उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ तपास करत आहेत.
स्वारगेट स्थानक परिसरात ज्येष्ठ महिलेच्या हातातील ५० हजार रुपयांची सोन्याची पाटली चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला ११ एप्रिल रोजी सायंकाळी स्वारगेटहून निगडीकडे निघाल्या होत्या. बसमध्ये गर्दी होती. बसमध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी कटरचा वापर करून महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कापून नेली. पोलीस उपनिरीक्षक कस्पटे तपास करत आहेत.