भरधाव टेम्पो रस्त्याच्या दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेला शिरल्याने समोरून येणाऱ्या मोटारीशी त्याची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार, तर आठ जण जखमी झाले. पुणे-मुंबई महामार्गावर कान्हे फाटा येथे गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींमध्ये दोन महिला व एक वर्षे वयाच्या मुलाचा समावेश आहे.
भाऊसाहेब घोडके (३५), सुभाष भताने (३४ दोघे रा. पाथर्डी, जि. नगर) व तानाजी खाडे ( ४४, रा. खोपोली) यांचा या अपघातात मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले. झायलो मोटारीतून सर्व जण नगरवरून मुंबईकडे निघाले होते. कान्हे फाटा परिसरातून मोटार जात असताना पुण्याच्या दिशेने एक टेम्पो भरधाव येत होता. टेम्पोच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा टेम्पो दुभाजकाला धडकला.
टेम्पोचा वेग प्रचंड असल्याने तो दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनवर आला. त्याच वेळी समोरून झायलो मोटार येत होती. टेम्पो थेट मोटारीवर जाऊन आदळला. त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. जखमींनी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अर्चना व सुयश खाडे यांच्यावर आकुर्डी येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघातानंतर टेम्पोचा चालक पळून गेला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या अपघातात सुयश खाडे हा एक वर्षांचा चिमुकला बचावला. सुदैवाने त्याला अगदी किरकोळ जखमा झाल्या आहेत.

Story img Loader