पुणे : नवीन मोटार खरेदी केल्यानंतर थेऊर येथील गणपती मंदिरात दर्शन घेऊन निघालेल्या तिघांचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना लोणीकंद- थेऊर रस्त्यावर रविवारी रात्री घडली. गणेश सुखलाल जाधव (वय ३५), विनोद तुकाराम भोजणे (वय ३६), विठ्ठल प्रकाश जोगदंड (वय ३६, तिघे रा. एलएनटी फाटा, सणसवाडी, सोलापूर रस्ता) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात हेमंत लखमन दलाई (वय ३०, रा. पाबळ चौक, शिक्रापूर, ता. शिरूर) जखमी झाला आहे. याप्रकरणी ट्रकचालक मच्छिंद्र तुकाराम जाधव (रा. गावठाण, काराठी, ता. बारामती) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बाळचंद्र शिवाजी पांचाळ (वय ३६, रा. बालाजी पार्क, केसनंद रस्ता, वाघोली, मूळ रा. कौठाळा, जि. लातूर) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश जाधव यांनी नवीन मोटार खरेदी केली होती. मोटार खरेदी केल्यानंतर गणेश, त्यांचे मित्र विनोद, विठ्ठल, हेमत थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिरात दर्शनासाठी रविवारी आले होते. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास दर्शन घेऊन ते मोटारीतून लोणीकंद-थेऊर रस्त्याने निघाले होते. जोगेश्वरी मंदिरासमोर भरधाव ट्रकने मोटारीला समोरुन धडक दिली. अपघातात गणेश, त्यांचे मित्र विनोद, विठ्ठल, हेमंत जखमी झाले. ट्रकच्या धडकेत मोटारीची दर्शनी बाजू चेपली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा…मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव मोटार उलटून दोघांचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी
मोटारीत अडकलेल्या चौघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच गणेश, विनोद, विठ्ठल यांचा मृत्यू झाला. ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली.