कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता घर सोडून आलेल्या दिल्लीतील तीन अल्पवयीन मुलींना पोलीस, हॅाटेल व्यवस्थापक आणि रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे त्वरीत मदत मिळाली. पोलिसांनी मुलींच्या कुटंबीयांशी संपर्क साधून मुली सुखरुप असल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

हेही वाचा : पुणे : विश्रांतवाडीत ‘डीआरडीओ’ संस्थेत बिबट्या

पुणे रेल्वे स्थानकावर तीन मुली रेल्वेने आल्या. स्टेशन परिसरातील एका हॅाटेलमध्ये तीन मुली गेल्या आणि त्यांनी खोलीसाठी विचारणा केली. त्यांच्यासोबत कोणी नसल्याचे मुलींनी सांगितले. त्यामुळे हॅाटेल व्यवस्थापकासह मुलींना हॅाटेल परिसरात सोडणाऱ्या रिक्षाचालकास संशय आला. त्यांनी त्वरीत या घटनेची माहिती समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, उपनिरीक्षक रणदिवे यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तीन मुलींना ताब्यात घेतले. चौकशीत तिघी नोकरीच्या शोधात पुण्यात आल्या होत्या. कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता त्या घर सोडून पुण्यात आल्याची माहिती चौकशीत मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधला.

हेही वाचा : पुणे/लोणावळा : ‘द्रुतगती’वरील अपघात रोखण्याच्या योजना कागदावरच ; चालकांचे नियमांकडे आणि यंत्रणांचे व्यवस्थेकडे दुर्लक्ष

मुली नोएडा भागातील रहिवासी आहेत. मुली बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी नोएडा येथील सेक्टर २० पोलीस ठाण्यात तक्रार दिली. समर्थ पोलिसांनी नोएडातील पोलीस उपनिरीक्षक नितीन जावला यांच्याशी संपर्क साधून मुली सुखरुप असल्याची माहिती दिली. मुलींची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने मुलींना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

Story img Loader