पुणे : राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात दोन तर पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या पाच झाली आहे. दरम्यान, राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या १४० वर पोहोचली आहे.
पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये ६० वर्षीय पुरूषाचा जीबीएसने शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. ते कल्पक होम (धायरी) येथील रहिवासी आहेत. त्यांना २३ जानेवारीला अतिसाराचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांच्या पायाला पक्षाघात झाला. त्यामुळे २७ जानेवारीला त्यांना पूना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला. याचबरोबर ससून सर्वोपचार रुग्णालयात ६५ वर्षीय पुरूषाचा आज मृत्यू झाला. ते नांदेड गावातील रहिवासी आहेत. त्यांना १६ जानेवारीला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना दाखल केले त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि पक्षाघात झाला होता. त्यांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.
पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पिंपळे गुरव परिसरातील एका ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ते कॅबचालक होते. त्यांना अशक्तपणा, ताप, खोकला असल्याने २१ जानेवारीला उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना जीबीएसची बाधा झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली. न्यूमोनियामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने ३० जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला.
राज्यात जीबीएसमुळे पहिला मृत्यू सोलापूरमध्ये नोंदविण्यात आला. धायरीतील रहिवासी असलेल्या ४० वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला होता. ते पुण्याहून सोलापूरला गेले होते. तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर ससून सर्वोपचार रुग्णालयात ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्या नांदोशीतील (किरकिटवाडी) रहिवासी होत्या. आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन दिवसांत तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या पाच झाली आहे.
अतिदक्षता विभागात ४५ रुग्ण
राज्यात आढळलेल्या एकूण १४० रुग्णांपैकी १११ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. त्यातील ४५ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याचबरोबर १८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यभरात २५ रुग्णांना उपचार करून रुग्णलयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
वयानुसार जीबीएस रुग्णसंख्या
वयोगट – रुग्ण
० ते ९ – २२
१० ते १९ – २०
२० ते २९ – ३२
३० ते ३९ – १६
४० ते ४९ – १३
५० ते ५९ – २२
६० ते ६९ – १४
७० ते ७९ – ०
८० ते ८९ – १
एकूण – १४०