पुणे : पुण्यातील मावळमधील शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या हत्येप्रकरणी मुख्य मारेकरी आरोपींना शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना आज वडगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. विशाल उर्फ किरण सुनील गायकवाड (वय २५), संदीप उर्फ अण्णा छगन गोपाळे (वय ३१) आणि ऋतिक शिवाजी गोपाळे (वय २२) सर्व राहणार शिरगाव, अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. यापैकी विशाल गायकवाड हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. अद्याप या हत्येचे मूळ कारण समोर आले नाही.
शनिवारी शिरगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच प्रवीण गोपाळे यांची प्रतिशिर्डी साई बाबांच्या मंदिरासमोर कोयत्याने वार करून क्रूरतेने हत्या करण्यात आली होती. प्रवीण गोपाळे हे राष्ट्रवादी पक्षाचे होते. काही महिन्यांपूर्वी शिरगाव ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली. प्रवीण गोपाळे यांना तेथील नागरिकांनी बिनविरोध निवडून दिले होते. शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास प्रवीण गोपाळे हे दुचाकीला टेकून मित्राशी बोलत होते. तेव्हा, रेकी करून आरोपी विशाल, संदीप आणि ऋतिक यांनी अचानक दुचाकीवर येऊन त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावणाऱ्या प्रवीण गोपाळे यांना काही अंतरावर गाठून त्यांच्या चेहऱ्यावर क्रूरतेने कोयत्याने वार करून हत्या केली. त्यानंतर, तिन्ही आरोपी दुचाकीवरून पसार झाले होते. त्यांना पहाटे तीनच्या सुमारास शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ऐन लोकवस्तीच्या ठिकाणी नागरिकांसमोर हत्या झाल्याने अनेक प्रश्नदेखील उपस्थित केले जात होते. आत्तापर्यंत या हत्येप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.