लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : बाणेर, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. बाणेर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जाधव, सहायक निरीक्षक ऋतुजा जाधव, तसेच पोलीस उपनिरीक्षक आर. आर. पाटील यांची बदली करण्यात आली. एकाच पोलीस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्तांनी बदली केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
बाणेर पोलीस ठाण्यातील नवनाथ जाधव यांची कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांची बाणेर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियु्क्ती करण्यात आली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावंत यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीची दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी त्यांची बाणेर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे.
बाणेर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह दोन महिला अधिकाऱ्यांची झालेली बदली ही कारवाईचा भाग असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली. बाणेर पोलीस ठाण्यातील फर्निचरचे नुतनीकरण सुरू असताना एक पोलीस कर्मचारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीत बसल्याचे छायाचित्र प्रसारित झाले होते. छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांची खडक पोलीस ठाण्यात तसेच पोलीस उपनिरीक्षक आर. आर. पाटील यांची न्यायालयीन बंदोबस्त कामी (कोर्ट कंपनी) नियुक्ती करण्यात आली.
गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्याकडे त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.