पुणे : शहरात वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात तीन पादचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. लोहगाव, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग तसेच नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात हे अपघात झाले.

पुणे-नगर रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेने पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रोहित मोतीराम येवले (रा. लोणीकंद) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात वाहनचालका विरोधात लोणीकंद पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहितचा भाऊ नागेश याने याबाबत फिर्याद दिली आहे. पुणे-नगर रस्त्यावरील हॅाटेल आनंद मिसळ समोर पादचारी रोहितला अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रोहितचा उपचारांपूर्वी मृत्यू झाला. पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यात येत आहे.

लोहगाव भागातील केंद्रीय विद्यालयासमोर भरधाव दुचाकीच्या धडकेने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. रामेश्वर भानारकर (रा. लोहगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. रामेश्वर यांचा मुलगा कृष्णा (वय २८) याने याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. केंद्रीय विद्यालयासमोरील रस्ता ओलांडत असताना पादचारी रामेश्वर यांना दुचाकीने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सिंहगड रस्ता परिसरातील मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर टेम्पोच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. पादचाऱ्याचे वय अंदाजे ३२ वर्ष असून या प्रकरणी टेम्पो चालका विरोधात सिंहगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader