पुण्याच्या आंबेठाण येथे शेतातील पाणी साचलेल्या खड्ड्यात अंघोळीसाठी उतरलेल्या तीन लहानग्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळं हळहळ व्यक्त केली जात आहे. राकेश किशोर दास वय- ५, रोहित किशोर दास वय- ८ आणि श्वेता किशोर दास वय- ४ अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नाव आहेत. मृतदेह मिळालेल्या खड्ड्याच्या बाजूला मुलांचे कपडे आढळले आहेत. त्यामुळं ते अंघोळीसाठीच खड्ड्यात उतरले असावेत अस पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या आंबेठाण येथे शेतातील खड्ड्यात अंघोळीसाठी गेलेली तीन बहीण भाऊ यांचा बुडून मृत्यू झाला आहे. राकेश, रोहित आणि श्वेता अशी त्यांची नाव असून पैकी रोहित ने आम्ही अंघोळीसाठी जात आहोत अस घरी सांगितलं होतं. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घरापासून अगदी काही अंतरावरच तो खड्डा आहे.
तिन्ही भावंडे त्या शेतातील खड्ड्यात कपडे काढून उतरले. परंतु, यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. खड्ड्याच्या शेजारून एक पाय वाट आहे. तिथून जाणाऱ्या व्यक्तीने मुलाचे कपडे पाहिले. मयत मुलं जवळच राहात होती. त्यांच्या घरातील व्यक्तींना तुमची मुलं कुठं आहेत अस विचारल्यानंतर मुलं बाहेर गेली अस सांगण्यात आलं. यामुळं संशय बळावला आणि खड्ड्यात पाहिलं असता त्यांचा मृतदेह आढळला आहे. शेतात अशा प्रकारे पाण्याने भरलेले खड्डे असल्यास त्याच्या भोवती कुंपण करण्याचं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी पोलीस पाटील यांना केलं आहे.