पिंपरी : दाट लोकवस्ती असलेल्या वाकड भागात बांधकाम करण्यात येत असतानाच वाकलेली इमारत अखेर महापालिकेने पाडली. दरम्यान, धोकादायक काम केल्यामुळे विकासकाला नोटीस दिली जाणार आहे. पाडण्याचा खर्च वसूलही केला जाणार आहे.
वाकड पोलीस ठाण्यासमोर बांधकाम व्यावसायिक सुनील दोलवानी यांच्या तीन मजली (G+3) इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीचे जवळपास सर्व काम पूर्ण होत आले आहे. मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास या इमारतीच्या बांधकामाने आपली जागा सोडली. त्यामुळे इमारत वाकली गेली. या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. राहुल सरोदे यांनी थेरगाव उप अग्निशमन केंद्राला याबाबत माहिती दिली. त्यानुसार पिंपरी आणि थेरगाव येथील अग्निशमन बचाव पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. दरम्यान पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले. वाकलेली इमारत पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. इमारत पडणार अशी भीती सर्वजण व्यक्त करत होते.
हेही वाचा…पिंपरी : महापालिकेची ११०० जाहिरात फलकधारकांना नोटीस; दिला ‘हा’ इशारा
इमारतीच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. अग्निशमन जवानांनी पोलिसांच्या मदतीने इमारतीच्या आजूबाजूचा परिसर खाली केला. इमारतीला पोकलेनचा आधार दिला. अखेरीस सकाळी इमारत जमीनदोस्त करण्यात आली.