पिंपरी- चिंचवडचा शरद पवार यांनी दौरा करताच राष्ट्रवादीच्या गटात तिघांनी पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी गटाची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. काळेवाडी भागातील मच्छिंद्र तापकीर यांचे चिरंजीव सागर तापकीर, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शरद पवारांचे एके काळचे सहकारी अशोक पवार यांचे चिरंजीव उद्योजक राहुल पवार आणि संतोष शिंदे यांनी पक्षप्रवेश केला आहे. मुंबईच्या प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तिघांनी पक्षप्रवेश केला आहे.
हेही वाचा >>> हिंजवडीत महिलेच्या प्रियकराचा खून; मृतदेह मुळशी धरणात टाकला; पती अटकेत
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकताच पिंपरी- चिंचवड शहरातील काही भागांमध्ये दौरा केला. त्यांचं काही भागांमध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार स्वागत करण्यात आलं. शरद पवारांच्या या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून शरद पवार गटामध्ये कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरू झाली आहे.
हेही वाचा >>> डीजेच्या लेझर बीममुळे पुण्यातील २३ वर्षीय तरुणाने ७० टक्के दृष्टी गमावली
अजित पवार गटामध्ये घुसमट होत असल्याने अनेक जण शरद पवार गटात येण्यास इच्छुक असल्याचं यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सांगितलं आहे. त्याचमुळे दोन वेळा नगरसेवक आणि माजी विरोधी पक्षनेते राहिलेले मच्छिंद्र तापकीर यांचे चिरंजीव सागर तापकीर, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शरद पवार यांची निकटवर्तीय अशोक पवार यांचे चिरंजीव उद्योजक राहुल पवार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी- चिंचवड शाखेचे खजिनदार संतोष शिंदे यांनी मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटामध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी पिंपरी- चिंचवडमधील युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष इमरान शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आदी उपस्थित होते. पिंपरी- चिंचवड शहरातील अनेक जण शरद पवार गटात येतील असा विश्वास शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी व्यक्त केला आहे. काही दिवसांमध्ये शरद पवार यांची मोठी सभा घेण्यात येणार आहे. तेव्हा ते पिंपरी- चिंचवडकरांविषयी आपली भूमिका नक्कीच मांडतील असे देखील कामठे यांनी म्हटले आहे.