पिंपरी चिंचवड शहरात विविध गुन्ह्यातील चार संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक पिस्तुलसह अन्य गुन्ह्यातील ३ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यात १ लाख ९५ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक उर्फ डी. बाबा काशिनाथ कांबळे (वय २८, रा.नेहरूनगर) व राजेश मनोहर स्वामी (वय ३१, रा. दापोडी) हे नेहरूनगर येथे पिस्तुल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली असता सापळा रचून त्यांना शनिवारी (ता.१) पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ५० हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तुल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसऱ्या घटनेत, गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी काढण्याची तयारी करत असताना संत तुकाराम नगर येथे निर्मला तारळकर (वय ६१) या गुढी काढत असताना संशयित आरोपी अहमद मदलूब शेख (वय ३२) याने पिण्यासाठी पाणी द्या अशी मागणी करत त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र ओढून तेथून पळ काढला होता. त्यानंतर पोलिसांनी पिंपळे गुरव येथून संशयावरून शेखला पकडले. त्याच्याकडून चैन आणि मंगळसूत्र चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आले. त्याच्याकडून एकूण १ लाख ९५ हजाराचे गंठण, सोन्याची चैन, दोन मंगळसूत्र जप्त करण्यात आले.
तिसऱ्या घटनेत खबऱ्या मार्फत माहिती मिळालेल्या माहितीनंतर सुरज दिनेश जावळे (वय १९, रा. बालाजी नगर, भोसरी) या वाहन चोराला ताब्यात घेण्यात आले. चौकशी केली असता त्याच्याकडून ३ चोरीचे वाहन आणि १ घरफोडी असे एकूण ४ गुन्हे उघडकीस आले. १ लाख ४५ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. त्यात ३ दुचाकी १ घरफोडीतील रोख रकमेचा समावेश आहे, असा एकूण ८ गुन्हे उघडकीस आणले. त्यापैकी ३ चेन चोरीचे गुन्हे, ३ वाहन चोरीचे गुन्हे, १ घरफोडी आणि १ देशी बनावटीचे पिस्तुल अशा गुन्ह्यातील ३ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three suspected accused arrested in pimpri chinchwad for chain snatching burglary