पुणे : ‘जी २०’ परिषद तसेच शहरात दहशत माजविण्याच्या घटनांमुळे पोलिसांनी शहरातील तीन हजार ७६५ गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. पोलिसांनी मध्यरात्री विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांची चौकशी केली. चौकशीत ६९८ गुन्हेगार राहत्या पत्त्यावर वास्तव्यास असल्याचे आढळून आले. सराईत गुन्हेगारांकडून पिस्तुलासह, काडतुसे, १४५ कोयते जप्त करण्यात आले.

पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, रंजनकुमार शर्मा, रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, संदीपसिंह गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर आणि पोलिसांची पथके या कारवाईत सहभागी झाली होती.

हेही वाचा – सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर, नवी दिल्लीचा हर्ष चौधरी देशात पहिला

पोलिसांनी शहरातील हाॅटेल, लाॅज, एसटी स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात तपासणी मोहीम राबविली. सिंहगड रस्ता पाेलिसांनी धायरी भागातील निलेश शिवाजी गायकवाड (वय ३५) याला पकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी ४३ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १४५ कोयते, तलवार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढव्यातील बेकायदा हुक्का पार्लरवर छापा टाकून हुक्का पार्लरचा मालक शाहरुख हारू शेख (वय २५) याला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली. बेकायदा नायलाॅन मांजा विक्री प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी ८८ जणांना अटक केली.