पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचे स्वरूप बदलण्यात आले आहे. आता त्याला अर्थसाह्याचे स्वरूप देण्यात आले असून, एकूण सहा अर्थसाह्य योजनांसाठी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवी स्तरावरील एकूण ३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना योजनेनुसार दोन ते १८ हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.
विद्यापीठाच्या आवारातील शैक्षणिक विभागांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसह कार्यक्षेत्रात पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी सहा योजना राबवण्यात येतात. त्यात छत्रपती शिवाजी महाराज अर्थसाह्य योजना, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसाह्य योजना, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अर्थसाह्य योजना, राजर्षी शाहू महाराज अर्थसाह्य योजना, महात्मा जोतिराव फुले अर्थसाह्य योजना, स्वामी विवेकानंद अर्थसाह्य योजना यांचा समावेश आहे. या योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येते. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाने प्रसिद्ध केली आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसाह्य योजनेत प्रत्येकी पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यात पदवीपूर्व स्तरावरील ७८३ विद्यार्थ्यांची, तर पदव्युत्तर स्तरावरील २४४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अर्थसाह्य योजनेतही प्रत्येकी ५ हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यात पदवीपूर्व अभ्यासक्रमांचे २९२, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे २२५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. राजर्षी शाहू महाराज अर्थसाह्य योजनेत ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी पदवीपूर्व स्तरावरील कला शाखेतील ९२, वाणिज्य शाखेतील २०७, विज्ञान शाखेतील २४९ विद्यार्थी प्राप्त ठरले आहेत. तर पदव्युत्तर स्तरावरील कला शाखेतील ९१, वाणिज्य शाखेतील ४०, विज्ञान शाखेतील १४४ विद्यार्थ्यांना अर्थसाह्य दिले जाणार आहे.
महात्मा जोतिराव फुले अर्थसाह्य योजनेत पदवी स्तरावर सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यात कला शाखेतील ४०, वाणिज्य शाखेतील १९३, विज्ञान शाखेतील २१६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. पदव्युत्तर पदवी स्तरावर कला शाखेतील ५०, वाणिज्य शाखेतील ५१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ८ हजार रुपये दिले जाणार आहेत. तर विज्ञान शाखेतील १८७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १६ हजार रुपये मिळणार आहेत. पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त आणि आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद अर्थसाह्य योजनेत पदवी अभ्यासक्रमातील ९३ आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील १८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज अर्थसाह्य योजनेत पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील एकूण ३६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये दिले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शासकीय योजनांचा लाभ घेतला असल्यास विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही, असा नियम विद्यापीठाच्या योजनांसाठी होता. त्यामुळे या योजनांसाठी विद्यार्थी पात्र ठरत नव्हते. परिणामी, शिष्यवृत्तीसाठीचा निधी पूर्णपणे वापरला जात नव्हता. ही बाब लक्षात घेऊन शिष्यवृत्ती योजनांचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या योजनांना अर्थसाह्य योजना असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी या योजनांसाठी पात्र ठरू शकतात. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक महाविद्यालयापर्यंत योजनांची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.- डॉ. पराग काळकर, प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ