पिंपरी- चिंचवडमधील ताथवडे येथे जेएसपीएम विद्यालयाच्या परिसरात अचानक तीन ते चार स्कूल बसला आग लागल्याने मोठे स्फोट घडले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थी आणि नागरिक या स्फोटांच्या आवाजामुळे रस्त्यावर सैरावैरा धावत सुटले. धुरांचे लूट आणि ज्वाळा काही किलोमीटरवरून दिसत होत्या, याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्कूलबस या गॅसवरील असल्याने मोठा स्फोट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेएसपीएम महाविद्यालयाच्या परिसरात त्या विद्यालयाच्या स्कूलबस पार्क करण्यात आलेल्या आहेत. या सर्व बस गॅसवरील असून रविवारी रात्री सव्वा अकराच्या अचानक तीन ते चार बसला अचानक आग लागल्याने एकापाठोपाठ एक स्फोट झाले. स्फोटांचा आवाज काही किलोमीटर पर्यंत ऐकायला गेला तर धुरांचे लोट आणि ज्वाला देखील दिसत होत्या. या भीषण घटनेमुळे काही क्षणातच परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी सैरावैरा रस्त्यावर धावत होते. घटनास्थळी पोलिसांनी अग्निशमन दलाचे जवान पोहचले असून आग विझवण्यात आली आहे. पोलिसांनी घाबरून न जाण्याच आवाहन केलं आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही.