पुणे : देशात अनेक जण ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेल्याची प्रकरणे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने तीन प्रकारच्या गेमवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोमवारी केली.जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या तिसऱ्या परिषदेत माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की सरकारने सर्वांशी सल्लामसलत करून नवीन आराखडा तयार केला आहे. विशिष्ट प्रकारच्या तीन प्रकारात मोडणाऱ्या गेमवर बंदी घातली जाणार आहे. यात सट्टा लावण्यात येणाऱ्या, वापरकर्त्यासाठी हानिकारक असलेल्या आणि व्यसन लागू शकेल अशा तीन प्रकारच्या गेमचा समावेश आहे.
गेमिंगच्या माध्यमातून कथित धर्मांतर झाल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर चंद्रशेखर बोलत होते. ते म्हणाले,की ऑनलाईन गेमिंगबाबत सरकारने प्रथमच नियमावली तयार केली आहे. यानुसार तीन प्रकारच्या गेमना देशात परवानगी असणार नाही. याबाबत सरकारी पातळीवर कोणतेही दुमत नाही.