“मी दुधवाले काकांना पैसे दिले म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काका या दोघांना तुझे नाव सांगते. असा मला आईने दम दिला होता. त्यावर मी म्हटले नको सांगू, आई मी तुझे ऐकते. हे दोघे मला खूप आवडतात. त्यानंतर मला उद्धव काकांचा संध्याकाळी फोन आला. माझ्याशी उद्धव काका खूप छान बोलले, मी तिकडे येऊ का? असे ते म्हणाले. मात्र, काका इकडे येऊ नका करोना आहे ना असं मी त्यांना म्हणाल्याचं.. अवघी तीन वर्षांच्या अंशिका शिंदे ही चिमुकली आपल्या बोबड्या बोलात सांगते. एवढंच नाहीतर उद्धव काका १८ जूनला माझा वाढदिवस आहे. तेव्हा नक्की या आणि तुम्ही काळजी घ्या, असंही ती म्हणते.
पुण्यातील विश्रांतवाडी भागातील तीन वर्षांची अंशिका शिंदे या चिमुकलीने त्यांच्या घरी दूध विक्री करणार्या काकांना स्वतः पैसे दिले. त्यावर करोना संसर्गाच्या भीतीपोटी आई तिला रागवली, त्यामुळे अंशिका रुसून किचनमध्ये जाऊन बसली. रुसलेल्या अंशिकाची समजूत काढण्यासाठी आईने खूप प्रयत्न केले. मात्र काही केल्या ऐकत नसल्याने, तुझं नाव आता उद्धवकाका आणि मोदी बाबाना सांगू का? असं ती म्हणाली त्यानंतर अंशिका रडू लागली आणि नको सांगू, मी पुन्हा असं करणार नाही असं म्हणाली. तसंच मला मोदी बाबा आणि उद्धव काका खूप आवडतात असंही तिने सांगितलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर काही क्षणात तुफान व्हायरल झाला. तो थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचला. या चिमुकलीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काका म्हटल्याचे अधिक भावले, उद्धव ठाकरे यांनी अंशिकाच्या बाबांना फोन करून संवाद साधला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा थेट फोन आल्याने अंशिकाचे बाबा अमोल आणि आई कांचन भारावून गेले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत फोन झाल्याबद्दल अंशिकाचे बाबा अमोल शिंदे यांच्याशी लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीने संवाद साधाला, यावेळी अमोल शिंदे म्हणाले, मी एका खासगी कंपनीत कामाला आहे. आम्हाला तीन वर्षाची मुलगी आहे. आम्ही सर्व दररोज बातम्या तसेच इतर कार्यक्रम पाहत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषणही आवर्जून पाहतो, आमची मुलगी अंशिकाला ते दोघेही प्रचंड आवडतात. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाबा म्हणते, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काका म्हणत असते, हे पाहून आम्हाला खूप आनंद होतो.
तसेच, आमच्या घरी दररोज दूध पिशवी देण्यास काका येतात. त्यांचे महिन्याचे पैसे घेण्यासाठी गुरुवारी ते आले होते. तेव्हा अंशिकाने आईकडे हट्ट धरला की, मला पैसे द्यायचे आहे. त्यावर तिची आई रागावली. त्यामुळे अंशिका रुसून किचनमध्ये जाऊन बसली. आईने खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती काही ऐकण्याची मनस्थिती नव्हती. अखेर तुझं नाव नरेंद्र मोदी बाबा आणि उद्धव ठाकरे काकांना सांगू का? असा तिच्या आईने तिला दम दिला. त्यावर नको मी तुझा ऐकत जाईल, असं अंशिका म्हणू लागली व आम्ही ती हे बोलतानाचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडीओ मेव्हणायाला शेअर केला. त्याने तो व्हिडिओ फेसबुक पेजवर शेअर केला. त्यानंतर काही क्षणात राज्यभरात तो व्हायरल झाला. त्यावर अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. एवढंच नाहीतर हा व्हिडीओ थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचला. त्यावर त्यांच्या कार्यालयातून आम्हाला फोन आला की, तुमच्या सोबत मुख्यमंत्री साहेबांना बोलायचं आहे. सुरूवातीस आम्हाला विश्वासच बसत नव्हता की, आमच्यासोबत खुद्द मुख्यमंत्री बोलणार आहेत. आम्हीतर काय उत्तर द्यायच आणि काय विचारणार याच विचारात होतो. अखेर दुसर्या दिवशी दुपारी एक वाजेच्या सुमारास आम्हाला फोन आला. त्यांच्या सोबत दोन मिनिट बोलणे झाले. मात्र हा संवाद आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. हे सर्व स्वप्नवत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या राज्याचे प्रमुख असून, आपल्या सर्वांची ते काळजी घेत आहेत. आता आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की, त्यांच्याकडून येणार्या सूचनांचे पालन करून, आपल्या राज्याला करोनामुक्त करायचे.
तर अंशिकाच्या आई कांचन शिंदे म्हणाल्या की, आपल्या घरातील वडिलधार्या मंडळीचं लहान मुलं ऐकत असतात. ते पाहून मी ज्यावेळी अंशिकाने दूधवाल्या काकांना पैसे देण्याचा हट्ट धरला. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव सांगेल असे तिला सांगितले. त्यावेळी ती रडू लागली, त्यांना नको सांगू, मी तुझा ऐकत जाईल असे म्हटले आणि तो व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केला होता. यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. मात्र, कधी मनातही आले नव्हते की आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत संवाद साधण्याची संधी मिळेल. एवढ्या व्यस्त दिनक्रमातून त्यांनी आम्हाला फोन केल्याने, आम्ही खूप आनंदी आहोत. हा अनुभव कधीच विसरणार नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, आपण सर्व जण एकत्रित येऊन करोना विरोधात लढा देऊन सरकारला आणि प्रशासनाला सहकार्य करू, प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने आपल्या लहान मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.