पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) शिवाजीनगर स्थानक वाकडेवाडीला हलवून तीन वर्षे उलटल्यानंतरही ते मूळ जागी उभारण्याचा निर्णय झालेला नाही. हे स्थानक मूळ जागी उभारण्याच्या प्रस्तावावर अजूनही चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. नवीन स्थानकाच्या व्यावसायिक संकुलावरून घोडे अडले असून, त्यावर निर्णय घेण्याऐवजी एसटीकडून केवळ पत्रव्यवहार सुरू आहे. यावर एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
शिवाजीनगर एसटी स्थानकाची चार एकर जागा होती. त्यातील एक एकर जागा महामेट्रोला भुयारी मेट्रो स्थानक उभारण्यासाठी देण्यात आली. याबाबत मेट्रो आणि एसटीमध्ये करार झाला होता. शिवाजीनगर स्थानक पाडल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात ते २०१९ मध्ये वाकडेवाडी येथे दुग्धविकास विभागाच्या जागेत हलवण्यात आले. या जागेचे भाडे मेट्रो दुग्धविकास विभागाला देणार, असा निर्णय झाला होता. तीन वर्षांच्या कालावधीसाठी हे ठरले होते. आता त्याला चार वर्षे उलटली असून, शिवाजीनगर मेट्रो स्थानक सुरू झाले आहे. तरीही एसटी स्थानक अजूनही वाकडेवाडी येथेच आहे.
हेही वाचा – पुणे: कुरुलकर प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत घ्या! ‘एटीएस’कडून न्यायालयात अर्ज
एसटीच्या जागेपोटी शिवाजीनगर एसटी स्थानक महामेट्रो उभारणार आहे. महामेट्रोने तळमजल्याचे बांधकाम करून, त्यावर २१ फलाटांचे स्थानक आणि एसटीची कार्यालये असे बांधकाम करून देण्याची तयारी दर्शविली आहे. एसटीने या जागी व्यावसायिक संकुल बांधण्याचा आग्रह धरला आहे. याबाबत एसटीच्या उपसरव्यवस्थापकांनी महामेट्रोला ४ मे रोजी पत्र पाठविले होते. त्यात शिवाजीनगर येथे एसटीच्या जागेवर व्यावसायिक संकुल उभारण्याची व्यावसायिक व्यवहार्यता तपासण्याची मागणी करण्यात आली. त्यावर महामेट्रोने २२ ऑगस्टला एसटीला पत्र पाठवून व्यावसायिक संकुल उभारणे व्यवहार्य नसून, तिथे एसटी स्थानक उभारून देण्याचा पुनरुच्चार केला आहे. आता अद्याप यावर एसटीने निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.
शिवाजीनगर कार्यशाळा अखेर कुठे?
शिवाजीनगर स्थानकात आधी एसटीची कार्यशाळा होती. ती एसटी स्थानकासोबत वाकडेवाडीला स्थलांतरित करण्यात आली. आता ही कार्यशाळा सांगवी येथे हलविण्याचा प्रस्ताव आहे. याच वेळी दुग्धविकास विभागाची जागा कार्यशाळेला मिळावी, असाही प्रस्ताव आहे. मात्र, यावरही एसटीकडून अद्याप ठोसपणे निर्णय घेण्यात आलेला नाही.
हेही वाचा – पिंपरी चिंचवडमधील दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू
शिवाजीनगर येथील एसटी स्थानकाची ३६ गुंठे जागा महामेट्रोने घेतली. या जागेच्या बाजारमूल्याएवढे एसटी स्थानक मेट्रो बांधून देईल, असे आधी ठरले होते. एसटीकडून नवीन स्थानकाचा आराखडा अद्याप मेट्रोला पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्हाला त्यांना बांधकाम करून देता आलेले नाही. – हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो