लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: भारत आणि ऑस्ट्रिया यांच्या राजकीय मैत्रीपूर्ण संबंधांची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे १७ जूनला संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी भारतभरातील २७ युवा वादक आणि गायकांची निवड करण्यात आली असून, त्यात पुण्यातील रुचिर इंगळे, इरावती जोशी, अंतरा बापट यांची निवड झाली आहे.
इंडियन नॅशनल युथ ऑर्केस्ट्रा अँड कोरस आणि व्हिएन्ना युनिव्हर्सिटी फिलहार्मोनिक यांच्यातर्फे संगीतकार कार्ल ऑर्फ यांनी संगीतबद्ध केलेला कार्मिना बुराना हा संगीत कार्यक्रम होणार आहे. १७ जूनला व्हिएन्ना येथील सादरीकरणानंतर भारतात लखनऊ येथे २९ ऑक्टोबरला आणि नवी दिल्ली येथे ३१ ऑक्टोबरला हा कार्यक्रम सादर होणार आहे.
हेही वाचा… पुणे: PMPकडून ‘हे’ ११ मार्ग पुन्हा सुरू
आंतरराष्ट्रीय स्तरावरील या कार्यक्रमासाठी पुण्यातील रुचिर इंगळे, इरावती जोशी, अंतरा बापट यांना व्हायोलिन वादनाची संधी मिळाली आहे. रुचिर, इरावती आणि अंतरा सुझुकी स्कूल ऑफ व्हायोलिनच्या संस्थापिका रमा चोभे यांच्याकडे गेली बारा वर्षे व्हायोलिन वादनाचे धडे घेत आहेत.