पिंपरी- चिंचवडमध्ये वाकड पोलीस ठाण्यासमोर पोलिसांना मारहाण केल्याची घटना ताजी असताना पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील दापोडी पोलीस चौकीच्या बाजूलाच पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यातील एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नातेवाईकांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. या प्रकरणी रवींद्र दादाराव कोंडगे, वैजनाथ दादाराव कोंडगेसह पाच जणांना भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे.

ट्रकचालक अनिलकुमार छोटेलाल मित्रा आणि कारचालक वैजनाथ दादाराव कोंडगे हे दापोडी चौकीजवळ भांडत होते. दोघांच्या गाडीचा फुगेवाडी येथे किरकोळ अपघात झाला होता.कारचालकाने तीन भावासह एका मित्राला बोलवत ट्रकचालकाला बेदम मारहाण केली. याची माहिती कंट्रोल रूममधून गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांना तक्रार दाखल करण्याची विनंती केली. यानंतर ट्रकचालक पोलिसांसोबत दापोडी चौकी येथे आला,परंतु कारचालकाने तिथेच मित्रांसमवेत पुणे-मुंबई जुना महामार्ग रोखून धरला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली.फिर्यादी पोलीस शिपाई सचिन भागाजी आणि पोलीस कर्मचारी नरवडे हे त्यांना हटवण्यासाठी गेले असता तिघांनी नरवडे यांना बेदम मारहाण करत शिवीगाळ केली आहे.याप्रकरणी भोसरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली.दरम्यान,हे सर्व पिंपरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नातेवाईक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.त्यामुळेच त्यांनी दबंगगिरी करत पोलिसांना बेदम मारहाण केल्याची चर्चा आहे.

Story img Loader