पिंपरी : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पार्टी करीत असताना एका विद्यार्थ्यावर अत्याचार करून त्याची नग्नावस्थेतील चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रेयस संजय कवडे (वय १९, हिंजवडी, मूळ – धाराशिव), ललित प्रमोद भदाने (वय २१, हिंजवडी, मूळ – धुळे) आणि राम तुळशीराम गंभीरे (वय ३५, हडपसर, मूळ -लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत २० वर्षीय पीडित तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण, श्रेयस आणि ललित हे तिघे ताथवडे येथील एका शिक्षण संस्थेत शिकत आहेत. पीडित तरुण आणि रामच्या मावसभावाचा वाद झाला होता. त्या वादातून पीडित तरुणाला मारुंजी रोड येथील एका सोसायटीमधील सदनिकेवर बोलावून घेतले. तेथे पार्टी चालू असताना रामने पीडित तरुणाला सिगारेट दिली. ती सिगारेट तरुणाकडून खाली पडली. पीडित तरुणाने सिगारेट उचलून ठेवली. त्यावरून रामने ‘तू माझी बरोबरी करतो का’ असे म्हणत पीडित तरुणाला मारहाण केली. तरुणाला कपडे काढण्यास सांगितले. ललितने या प्रकरणाची चित्रफीत बनवून समाजमाध्यमावर प्रसारित केली. राम याने पीडित तरुणाला ‘तुला कोणाकडे जायचे ते जा, माझ्यावर ५३ गुन्हे आहेत. माझे कोणी काहीही बिघडू शकत नाही’, अशी धमकी दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैयाकुमार थोरात तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three youths arrested for abusing a college student in tathawade pune print news ggy 03 amy